नवी दिल्ली - कोलकात्यातील वैद्यकीय महाविद्यालयात महिला निवासी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेचे देशभरात संतप्त पडसाद उमटले. डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या मुद्यावर देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टरांनी ५ दिवस संप केला. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित इंडियन मेडिकल असोसिएशनसह (आयएमए) सर्व डॉक्टर संघटना, हॉस्पिटल संघटनांनी २४ तासांचा संप पुकारला. डॉक्टरांनी अत्यावश्यक वगळता इतर वैद्यकीय सेवा शनिवारी सकाळी ६ ते रविवारी सकाळी ६ पर्यंत बंद ठेवली. त्यामुळे रुग्णांची गैरसोय झाली.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या आवाहनाला प्रतिसाद देत राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, प. बंगाल, बिहार, झारखंड, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, मिझोरम आणि नागालँडसह अन्य राज्यांत डॉक्टरांनी २४ तासांच्या संपात सहभाग नोंदविला. दिल्लीतील सर गंगाराम फोर्टिस आणि अपोलोसारख्या रुग्णालयात ओपीडी, शस्त्रक्रिया आणि आयईपीडी सेवा बंद करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेच्या के ई एम, सायन, नायर, कूपर रुग्णालयातील डॉक्टरांनी सकाळी रुग्णालयात तर दुपारनंतर आझाद मैदानात निदर्शने केली.
प. बंगालमध्ये ज्युनियर डॉक्टर ८ दिवसांपासून संपावर आहेत. शनिवारी वरिष्ठ डॉक्टरांनीही संपात सहभाग नोेंदविला. सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनीही संपात सहभाग नोंदविला. त्यामुळे रुग्णांच्या सेवेवर परिणाम झाला. सरकारी रुग्णालयांसह खाजगी रुग्णालये आणि कार्पोरेट हॉस्पीटल, नर्सिंग होममधील डॉक्टरांनी संपात सहभाग नोंदविला. त्यामुळे शस्त्रक्रिया टाळल्या गेल्या. त्यामुळे रुग्णांचे हाल झाले.
डॉक्टरांचा संप यशस्वी झाल्याचा दावा आयएमएसह सर्व डॉक्टर संघटनांनी केला. बाह्य रुग्ण विभाग आणि नियमित सेवा बंद ठेवण्याचे आवाहन आयएमएने केले होते. या आवाहनाला सर्व डॉक्टर आणि रुग्णालयांनी प्रतिसाद दिल्याने संप यशस्वी झाला.
बाहय रुग्ण विभाग बंद -
डॉक्टरांच्या संपामुळे शहरातील खासगी रुग्णालयांतील बाहय रुग्ण विभाग शनिवारी बंद राहिला. या संपामुळे अनेक रुग्णांचे हाल झाले. खासगी डॉक्टर आणि खासगी रुग्णालये बंद असल्याने रुग्णांना सरकारी रुग्णालयात जावे लागले. यामुळे सरकारी रुग्णालयांत आज मोठी गर्दी दिसून आली. काही रुग्णांना रोज डॉक्टरांकडून उपचार आवश्यक असतात. अशा रुग्णांना ऐनवेळी सरकारी रुग्णालयांचा रस्ता धरावा लागला. त्यामुळे अनेक रुग्णांना गैरसोय झाल्याची तक्रार केली.
No comments:
Post a Comment