मुंबई - कष्टकऱ्यांच्या चळवळीत आणि संयुक्त महाराष्ट्राच्या नवनिर्मितीच्या लढ्यात अण्णा भाऊ साठे यांचे लोकशाहीर म्हणून मोठे योगदान आहे. त्यांचे साहित्य जगभरातील अनेक भाषांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्यांच्या योगदानाची दखल घेवून त्यांना भारतातील सर्वोच्च असा भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
अण्णा भाऊ साठे यांच्यामध्ये एक गीतकार, कादंबरीकार, कथाकार, पटकथाकार, नाटककार, पत्रकार आणि कष्टकऱ्यांच्या चळवळीवर अपार निष्ठा असलेला एक साम्यवादी कार्यकर्ता होता. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळीमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेलं योगदान महत्वाचं आहे. भारतीय भाषांमध्ये त्यांचे साहित्य अनुवादित झालेच, पण धर्मजातीच्या, देशकालाच्या सीमा ओलांडून ते जर्मन, शेक, इंग्लिश, पोलिश, रशियन, स्लोव्हाक या परकीय भाषांमध्ये भाषांतरित झाले.
रशियन सरकारने त्यांचा रशियात बोलावून यथोचित सत्कार केला होता, रशियात दरवर्षी त्यांची जयंती साजरी देखील केली जाते. पुरोगामी व बहुजनवादी समाजाचे महत्वाचे स्फुर्तीस्थान असलेले महानायक अण्णा भाऊ साठे यांना 'भारतरत्न' या देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने पुरस्कृत करण्यात यावे अशी मागणी अशोक कांबळे यांनी पत्राद्वारे केली आहे.
No comments:
Post a Comment