इंटरनेटमुळे मुलांचे मैदानी खेळ व बालपण अलिप्त होतंय - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 August 2024

इंटरनेटमुळे मुलांचे मैदानी खेळ व बालपण अलिप्त होतंय


मुंबई - आपल्याला तंत्रज्ञानाच्या युगात चांगली नवीन पिढी घडवायची आहे. आपण लहान असताना बालपण जगलो. मैदानी खेळ खेळलो. परंतु, आजकालची मुलं मैदानी खेळाऐवजी मोबाइलमध्ये गेम खेळतात. त्यामुळे मुलांमध्ये मैदानी खेळ व बालपण अलिप्त होत चालेल आहे. सध्या लहान मुलांच्या हातात देखील मोबाइल दिला जातो. पालकांपेक्षा मुलांना मोबाइल मधल सगळं माहिती असतं. त्यातूनच बालकांचे लैंगिक शोषण वाढू लागले आहे. इंटरनेट वापराला वयोमर्यादा नाही, त्यामुळे गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसतं आहे, असे प्रतिपादन महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी केले. 

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, महिला व बाल विकास आयुक्तालय व चाइल्ड फंड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने 'सेफ वेब फॉर चिल्ड्रन' या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ सह्याद्री अतिथीगृहात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी, तटकरे बोलत होत्या. तसेच, राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व चाइल्ड फंड इंडियाचे पदाधिकारी व सदस्य आदींची उपस्थिती होती. 

अदिती तटकरे म्हणाल्या की, आपण पाहतो की, जन्मलेल्या मुलांचे सोशल मीडियावर अकाऊंट असतात. लोक लाईक आणि शेअरसाठी भूकेलेले आहेत. परंतु, सायबर सेफ्टीचे महत्त्व काय? मोबाइल किती वापरावा, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. आता सरकार चाइल्ड पॉलिसी सुरू करत असून यात कोणत्या गोष्टी समाविष्ट केल्या पाहिजे. यावर बालहक्क संरक्षण आयोग आणि चाइल्ड फंड इंडिया यांनी माहिती द्यावी. राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शाह या महिलांसाठी व बालकांसाठी अनेक उपक्रम राबवित असतात. त्याबद्दल त्याचे विशेष आभार मानते, असेही त्या म्हणाल्या. 

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, अतिशय महत्त्वाच्या विषयावर एक महत्त्वाचे पाऊल आहे. मुलांना अपराधापासून लांब नेलं पाहिजे आणि तसं वातावरण ही घडवलं पाहिजे. आणि हे काम मुंबईमध्ये निश्चितपणे घडतय. लहान मुलांच्या बाबतीत होणारे गुन्हे हे अतिशय जवळून पाहिलेले आहे. मुलांना न्याय देण्यासाठी ॲड. सुशीबेन शाह यांनी आधुनिक पद्धत सुरू केली आहे. शाळांचा थेट सहभाग यामध्ये असावा आणि यासाठी लवकरात लवकर आम्ही परिपत्रक काढू, असेही ते म्हणाले. 

महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या ॲड. सुशीबेन शाह म्हणाल्या की, आज कोणीही इंटरनेट शिवाय राहू शकत नाही. आपल्या कुटुंबात तीन ते चार मोबाईल असतात. त्याचा वापर बालक करत असतात. सध्या बहुतांश सायबर गुन्हे हे आर्थिक गुन्हे आणि दुसरं म्हणजे लैंगिक छळ यावर होताना दिसतात. सार्वजनिक व्यासपीठावर सेक्सटॉर्शन हा अत्याचार केला जातो. या प्रकरणाबाबत जास्तीत जास्त जागरूकता पसरणे गरजेचे आहे. ऑनलाइन लैंगिक छळ ज्यांचा होतो त्यांना विविध प्रकारच्या असुरक्षिततेला सामोरे जावे लागते. त्यावेळी न्यायासाठी पुढे कोण येत नाही. त्यांना ट्रोल होऊन याची मोठी भीती असते. परंतु बालकांना आपले म्हणणे मांडण्यासाठी हे मुख्य व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत, असेही शाह यांनी सांगितले. 

याप्रसंगी, महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, महिला व बालविकास विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे आणि सायबर क्राईम मुंबईचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार, पालकांनी घ्यावयाची काळजी, सायबर क्राईम कशा पद्धतीने काम करते, बालक व पालक यांच्यामध्ये जनजागृती कशी करणे, बालकांसाठी कोणत्या हेल्पलाइन आहेत. मुलं इंटरनेटचा वापर सुरक्षित कसा करतील इत्यादी माहिती दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad