प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारणार - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 August 2024

प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारणार - मुख्यमंत्री



छत्रपती संभाजीनगर - येत्या चार दिवसांनी आपण देशाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहोत. बाबासाहेबांनी लिहिलेली राज्यघटना होती म्हणूनच आपण एक प्रजासत्ताक, सार्वभौम राष्ट्र म्हणून जगभर ओळखले जाऊ लागलो. ‘जब तक सुरज चांद रहेगा, बाबासाहेबका संविधान रहेगा’, बाबासाहेबांच्या संविधानाचा आदर वाढावा, त्याद्वारे सामाजिक न्यायाची भावना अधिक दृढ व्हावी यासाठी प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. तसेच शहराचा डीपी प्लॅन हा सर्वांच्या हिताचा असेल तोच करु अशी ग्वाहीही त्यांनी शहरवासियांना दिली.

छत्रपती संभाजीनगर येथील टीव्ही सेंटर चौकात आज मुख्यमंत्री कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात अजिंठा लेणी पायथ्याशी जागतिक दर्जाचे बुद्ध विहार विपश्यना केंद्र उभारणी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीसाठी ५० कोटी रुपये, भडकल गेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरणासाठी पाच कोटी रुपये, टीव्ही सेंटर येथे छत्रपती संभाजीमहाराज पुतळा व अशोक स्तंभ उभारणीसाठी पाच कोटी रुपये, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयासाठी २५ कोटी रुपये, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर डीजीटल प्रोजेक्टसाठी २५ कोटी रुपये, तारांगणासाठी १० कोटी तसेच मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेमार्फत बेरोजगारांना मदत अशा विविध विकास प्रकल्पांना निधी दिल्याबद्दल आज आंबेडकरी समाज समितीतर्फे मुख्यमंत्री शिंदे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

या सोहळ्यास केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, आमदार प्रदीप जयस्वाल, संजय शिरसाट तसेच संयोजक जालिंदर शेंडगे व सर्व समिती सदस्य उपस्थित होते.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांना मानपत्र देऊन त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

कृतज्ञता महामानवाप्रति - 
मुख्यमंत्री म्हणाले की, आज आपण कृतज्ञता सोहळा आयोजित केला आहे. त्यानिमित्ताने माझ्यावर प्रेम व्यक्त करणाऱ्या छत्रपती संभाजीनगरातील आंबेडकरी जनतेचे मनापासून आभार मानतो. पण, कृतज्ञता व्यक्त करण्यासारखे कोणतेही काम मी केलेले नाही. मी जे काही करतोय ते माझे कर्तव्य आहे आणि इथे जी काही कामे होत आहेत तो तुमचा तो अधिकार आहे. आपण सगळे बाबासाहेबांच्या महान कार्याला पुढे चालवणारे त्यांचे लहान अनुयायी आहोत. आपण भाग्यवान आहोत की, बाबासाहेबांसारखे मोठे व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रात जन्माला आले. आपण या महामानवा प्रति कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आज ज्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मी उभा आहे, या भूमीवर बाबासाहेबांचे पवित्र पाऊल पडले आहे. बाबासाहेबांना या शहराबद्दल विशेष आपुलकी होती, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आज आपण जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांच्या पायथ्याशी सुंदर असं बुद्ध विहार, विपश्यना केंद्र उभारणार आहोत. बाबासाहेबांचा पुतळा उभारतो आहोत. शहरातल्या प्रत्येक झोपडपट्टीत वाचनालय, रिसर्च सेंटरचा डिजिटल प्रोजेक्ट, तारांगण सेंटर, मागास उद्योजकांना स्वत:च्या पायावर उभे करणे असे विविध उपक्रम आपण राबवत आहोत. यातून प्रेरणा मिळावी हा आपला हेतू आहे.

संविधानाबद्दल गौरवोद्गार -
बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानावर आपला देश चालतो. चार दिवसांनी देशाचा ७८ वा स्वातंत्र्यदिन आहे. बाबासाहेबांची घटना होती म्हणूनच आपण एक प्रजासत्ताक, सार्वभौम राष्ट्र म्हणून जगभर ओळखले जातो. त्यामुळे संविधान बदलण्याच्या अपप्रचाराला आपण बळी पडू नका, असे सांगून ‘जब तक सुरज चांद रहेगा, बाबासाहेबका संविधान रहेगा’, अशा शब्दात त्यांनी संविधानाबद्दल गौरव व्यक्त केला.

महाराष्ट्र माझा परिवार -
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, हे सरकार दुर्बल, मागास, कष्टकरी, कामगार, गरिबांचे आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये एक लाख कोटींच्या योजना लागू केल्या आहेत. त्यापैकी ४५ हजार कोटी तर राज्यातील माझ्या भगिनींच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, युवा कार्य प्रशिक्षण, वर्षाला तीन सिलिंडर देणारी मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना सुरू केली. मुलींचे संपूर्ण शिक्षण मोफत केले. दुर्बलांना मदत करणे, त्यांचे जीवन आनंदी करणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि महाराष्ट्र हा माझा परिवार आहे, अशा शब्दांत त्यांनी उपस्थितांबद्दल आपुलकी व्यक्त केली.

त्यांनी सांगितले की, मुंबईत इंदू मिल इथे बाबासाहेबांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचे काम वेगाने सुरु आहे. बार्टीच्या ८६१ विद्यार्थ्यांना आम्ही फेलोशिप मंजूर केली. बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत, टीआरटीआय या संस्थाच्या अधिछात्रवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती या योजनांमध्ये समानता आणली. संजय गांधी, श्रावणबाळ योजनेत निवृत्तीवेतन वाढवले. राज्यातल्या ७३ अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांना नवे रूप देतो आहोत. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून गरीब, मागास, दुर्बलांना मुख्य प्रवाहात आणतोय, असे सांगून शासनामार्फत मागास घटकांच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहितीही उपस्थितांना दिली.

सर्वांच्या हिताचा विकास आराखडा - 
त्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देणारा जळगाव जालना या महामार्गाच्या उभारणीसाठी शासनाच्यावतीने द्यावयाच्या ३५५२ कोटी रुपयांचा हिस्साही भरण्यास मान्यता दिली आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर शहराच्या विकास आराखड्याबद्दल बोलतांना ते म्हणाले की, सर्वांच्या हिताचा विचार करणारा विकास आराखडा आपण तयार करु, हे घर देणारे सरकार आहे लोकांना बेघर करणारे नाही,असे आश्वासन त्यांनी दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौतम खरात यांनी केले. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आ. प्रदीप जयस्वाल, खासदार दिपान भुमरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad