पालिका शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात असे २८०० कॅमेरे लावले जाणार आहेत. हे काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. तशी हमीच पालिका शिक्षण विभागाने सीसीटीव्हीचे आदेश देणारे मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना प्रशासनामार्फत दिली आहे.
केसरकर यांनी दीड वर्षापूर्वी पालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी निधी उपलब्ध करून द्या, असेही पालिका प्रशासनाला बजावले होते. पण अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नव्हती. त्यामुळे गेल्याच आठवड्यात महापालिका मुख्यालयात झालेल्या आढावा बैठकीत केसरकर संतप्त झाले होते. त्यांनी पालिकेचे शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले होते. त्यानुसार कंकाळ यांचे निलंबन झाले आहे.
सोमवारपासून पालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू झाले आहे. याबाबत पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की पालिकेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी १०० कोटी रुपये खर्च येऊ शकतो आणि हे काम पूर्ण करण्यासाठी आणखी सहा महिने लागू शकतात.
बदलापूरच्या घटनेनंतर राज्यातील शाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालिकाही खडबडून जागी झाली असून शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या सीसीटीव्ही कॅमेर्यांचे रेकॉर्डिंग आणि बॅकअप सुरक्षित ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे अत्याचाराच्या घटनांना आळा बसणार असून अशा घटना घडल्यास गुन्हेगारांना तत्काळ शिक्षा देणे शक्य होणार आहे. पालिका शाळांमधील सर्व स्वच्छतागृहांची सफाई करण्याचे काम महिला सफाई कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत असल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेच्या एकूण १,१२९ प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. त्यापैकी ९४३ प्राथमिक शाळा आहेत. त्याशिवाय पालिकेकडून पूर्व प्राथमिक वर्गही चालविले जातात. असे एकूण ३ लाख ६ हजार विद्यार्थी पालिका शाळांतून शिक्षण घेत आहेत. त्यासाठी पालिकेने ९ हजार शिक्षक नियुक्त केले आहेत.
No comments:
Post a Comment