मुंबई - मुंबई शहरामध्ये महानगरपालिका, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या माध्यमातून रूग्णालये कार्यरत आहेत. या रूग्णालयांमध्ये सद्यस्थितीत असलेल्या सुविधांचा आढावा घेण्यासाठी मुंबईतील सर्व लोकप्रतिनिधींची पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येईल. मुंबईतील सर्व शासकीय रूग्णालयांमध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्धतेसाठी शासन गंभीर असून आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सुचनेच्या उत्तरात दिली. यासंदर्भात सदस्य कॅ. तमील सेल्वन यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या सुचनेच्या चर्चेत सदस्य सुनील प्रभू, अजय चौधरी, यामिनी जाधव, आदित्य ठाकरे, मनिषा चौधरी यांनी भाग घेतला.
अधिकची माहिती देताना मंत्री सामंत म्हणाले, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रूग्णालय अर्थात सायन रूग्णालयाचा पुर्नविकास दोन टप्प्यात करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात 616 कोटीची निवीदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून कार्यादेश देण्यात आले आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यातील कामाची 1507 कोटी रूपयांची निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या रूग्णालयाच्या व्यतिरिक्त नवीन जागेवर रूग्णालय बांधण्यात येत आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेले रुग्णालय सुरूच राहणार आहे. सायन रूग्णालयातील बाह्य रूग्ण विभागात दररोज 7 हजार रुग्णांची नोंदणी होते.
मंत्री सामंत पुढे म्हणाले, सायन रूग्णालयात 1000 कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, 300 वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी व 450 परिचारिका कार्यरत आहे. त्याशिवाय 150 परिचारिकांची नियुक्ती करण्यात येत आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या मानकांनुसार रुग्णालयात डॉक्टरांची संख्या आहे. रूग्णालयास आवश्यक औषधांचा पुरवठा मध्यवर्ती खरेदी खात्यातून करण्यात येतो. यासाठी पालिका स्तरावर निविदा प्रक्रिया अंतिम करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. तोपर्यंत जुन्या कंत्राटदारांकडून पूर्वीच्याच दराने औषधांचा पुरवठा करण्यात येत आहे. निविदा प्रक्रिया लांबण्याबाबत चौकशी करण्यात येईल.
नायर रूग्णालयातील दोन सी. टी स्कॅन यंत्र खरेदी करण्याबाबत आजच आदेश देण्यात येतील. ज्या भागात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करून बंद करण्यात आला असेल, सुविधा पुरविण्यात आल्या नसतील अशा ठिकाणी चौकशी करून कारवाई करण्यात येईल. केईएम रूग्णालयाला 100 वर्ष होत आहे. या रूग्णालयाच्या प्रस्तावावर शासन सकारात्मक निर्णय घेईल. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment