बसच्या धडकेत पाच वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 July 2024

बसच्या धडकेत पाच वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू


नाशिक - राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घडत असलेल्या हिट अँड रनच्या (Hit And Run) घटनांनी संपूर्ण राज्य हादरुन गेलं आहे. त्यात पुणे पोर्शे कार अपघातानंतर (Pune Porsche Accident) मुंबईतील वरळी हिट अँड रनच्या (Worli Hit And Run Accident) घटनांनी काळजाचा ठोका चुकवला आहे. अशातच नागपुर (Nagpur), नाशिक सारख्या शहारांमध्येही या आपघातांच्या मालिकेने सर्वांना हादरवून सोडलं आहे. अशातच आता नाशिक शहरात एक भीषण अपघाताची घटना घडली असून यात एका चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला आहे.  

नाशिक (Nashik) शहरात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात शहरातील बसच्या धडकेत एका शाळकरी मुलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. आज, 10 जुलै रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास नाशिक रोडवरील मनपा सिटी लिंक बस डेपो मध्ये ही घटना घडली. बस डेपोच्या आवारात जिजाबाई गवई यांची चहाची टपरी असून त्यांची नात सानवी सागर गवई (वय 5 वर्ष रा. नाशिकरोड) ही तिच्या आजोबांसोबत शाळेतून चहा टपरीवर जात होती. दरम्यान सिटीलींक बस चालकाने भरधाव वेगाने तिला मागून धडक दिली. या अपघातात तिच्या डोक्यावरून बसचे चाक गेल्याने तिचा जागेवर मृत्यू झालाय. तर तिच्या आजोबांचा जीव थोडक्यात बचावला असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. सध्या त्यांच्यावर बिटको हॉस्पिटल येथे औषध उपचारासाठी दाखल केले आहे. मात्र या अपघाताने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून गेल्या दोन दिवसात ही तिसरी भीषण अपघाताची घटना आहे. तर आतापर्यंत अपघातांच्या घटनांमध्ये तिघांचा बळी गेला आहे. 

या अपघातात बस चालक हा मद्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. तर सदर घटना परिसरात कळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केलीय. त्यानंतर नाशिकरोड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला. या संदर्भात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून या घटनेचा अधिक तपास सध्या पोलीस करत आहे. मात्र या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून गवई कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad