क्षयरोगाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 July 2024

क्षयरोगाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण


मुंबई - देशाला सन 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त करण्याचे ध्येय केंद्र सरकारने ठेवले आहे. देशाच्या क्षयरोग मुक्तीच्या लढ्यात महाराष्ट्र राज्यही मागे नाही. राज्यातही क्षयरोग निर्मुलनाबाबत प्रभावी कार्यवाही करण्यात येत आहे. क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी केंद्र सरकारने 11 राज्यांमध्ये 18 वर्षावरील नागरिकांना क्षयरोगाची लस देण्याची मोहीम सुरू केली आहे. यामध्ये राज्याचाही समावेश आहे. लस घेण्यासाठी नागरिकांचे समुपदेशन करून जास्तीत जास्त नागरिकांना लस देण्याचा शासनाचा प्रयत्न राहील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

याबाबत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य पृथ्वीराज चव्हाण, राजेश टोपे, मनीषा चौधरी, आशिष शेलार, डॉ. नितीन राऊत, प्राजक्त तनपुरे, रोहित पवार यांनी भाग घेतला.

आरोग्य मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, मुंबई शहरात दाट लोकसंख्येमुळे क्षयरोगाचे प्रमाण जास्त आहे. मुंबई शहरातील क्षय रुग्णांचे प्रमाण कमी करणे, क्षयरोगाचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती महिनाभरात अभ्यास करून अहवाल सादर करेल. राज्यात 2022 मध्ये क्षयरोग रुग्ण संख्या 2 लाख 33 हजार 872, तर मुंबईत 65 हजार 435 होती. 2023 मध्ये राज्यात 2 लाख 27 हजार 646, मुंबईत 63 हजार 887, जून 2024 अखेर राज्यात 1 लाख 10 हजार 896, तर मुंबई शहरात 30 हजार 519 रूग्ण आहेत. राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मुंबई शहरात 27 टक्के रुग्णसंख्या आहे. त्यामुळे राज्य क्षयरोगमुक्त करण्यासाठी मुंबई शहरातून क्षयरोग हद्दपार करणे गरजेचे आहे.

मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, राज्यात क्षयरोगावरील औषधांचा पुरवठा केंद्र सरकारमार्फत करण्यात येतो. पुरवठ्यामध्ये अडचण निर्माण होण्याबाबत केंद्राने 2 फेब्रुवारी 2024 ला राज्यांना पत्र दिले. पत्र मिळताच राज्य शासनाने औषध उपलब्धततेसाठी उपाययोजना केल्या. तातडीने औषधी खरेदीसाठी जिल्हास्तरावर 1.63 कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे. राज्यात कुठेही क्षयरोगावरील औषधांची कमतरता नसून 3 एफडीसी ए औषधांचा पुरेसा पुरवठा आहे.

डीप फ्रीजर खरेदीबाबत अनियमितता आढळून आल्यास याबाबत संपूर्ण अहवाल मागविण्यात येईल. यामध्ये त्रुटी आढळल्यास निविदा प्रक्रिया थांबविली जाईल. ‘ड्रग रेजिस्टंट’ (औषध प्रतिरोधक) क्षयरोगाबाबत उपचार वेळेत मिळणे महत्त्वाचे असते. अशा रुग्णांनी 6 महिने नियमित उपचार घेणे गरजेचे असते. यामध्ये उपचार न घेणे, व्यसनाधिनता यामुळे सदरचे उपचार 18 महिन्यांवर जातात, असे मंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

निक्षय पोर्टलवर क्षय रुग्णांची नोंदणी करण्यात येवून नियंत्रण करण्यात येते. निक्षय पोषण अहार योजनेच्या माध्यमातून क्षय रुग्णांच्या बँक खात्यात पोषण आहारासाठी दरमहा 500 रुपये टाकण्यात येतात. या योजनेसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येतो. राज्यात 2023 मध्ये या योजनेद्वारे 74 कोटी 32 लख व जून 2024 अखेर 8 कोटी 74 लक्ष रूपयांचा निधी क्षय रुग्णांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. निधी दिला म्हणजे पोषण आहार दिला असे नाही, या निधीच्या उपयोगाबाबत आरोग्य विभाकडून आढावा घेण्याचे आदेश देण्यात येतील. निक्षय मित्र होवून आपणही क्षय रुग्णांना बरे करण्यास मोलाची भूमिका बजावू शकतात. त्यासाठी सर्वांनी निक्षय मित्र होण्याचे आवाहनही आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी केले.

मुंबई शहरात अन्य राज्यांमधील नागरिक मोठ्या संख्येने कामासाठी येत असतात. अशा परिस्थितीत काहींमध्ये क्षय रुग्णाचे निदान होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना ते गावाकडे निघून जातात. याबाबत संबंधित राज्याच्या आरोग्य विभागाला माहिती देवून त्यांचे पुढील उपचार त्याच ठिकाणी सुरू राहण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल. राज्यात तमिळनाडू राज्याच्या धर्तीवर वैद्यकीय वस्तू व औषधी खरेदी प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. प्राधिकरणाकडे पुरेसे मनुष्यबळ असून आवश्यकता असल्यास गरजेनुसार कंत्राटी तत्वावरसुद्धा मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यात येते. या प्राधिकरणाअंतर्गत पारदर्शक पद्धतीने औषधी व वैद्यकीय वस्तू खरेदी प्रक्रिया राबविण्यात येत आहे, असेही मंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad