छत्रपती संभाजीनगर - नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुती सरकारला फटका बसला आहे. आगामी विधसनसभा निवडणुकीत पुन्हा फटका बसू नये म्हणून महायुतीमधील पक्षांकडून काळजी घेतली जात आहे. असे असतानाच आता उद्धव ठाकरे यांनी भाजपासह एकनाथ शिंदे यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्का देण्याची मोठी खेळी खेळली आहे. उद्धव ठाकरे यांच्या या खेळीमुळे भाजपाचे नेते तथा मंत्री अतुल सावे तसेच शिंदेंचे आमदार संजय शिरसाट यांना मोठा धक्का बसणार आहे.
छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा गड मानला जातो. शिवसेनेमध्ये फूट पडल्यावर छत्रपती संभाजीनगरमधील आमदार संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेत खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला. या पराभवाचा वचपा काढण्याची संधी उद्धव ठाकरे यांच्याकडे चालून आली आहे. जिल्ह्यातील भाजपा केवळ शिंदेच्या शिवसेनेचे काम करण्यासाठी असल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हातील भाजपाचे ८ ते ९ नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. येत्या ७ जुलै रोजी हा पक्ष प्रवेश होणार आहे.
याबाबत भाजपाचे संभाजीगरचे माजी महापौर राजू शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी मी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेले पाहिजे, अशी कार्यकर्ते आणि नागरिकांची इच्छा आहे. सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्याचा आमचा विचार चालू आहे. येथे भाजपा फक्त शिंदे गटाचे काम करण्यासाठीच राहिलेली आहे, असे आम्हाला वाटते. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून भाजपाने येथे मेहनतीने काम केले. पण ही जागा शिंदे गटाला दिली गेली. लोकसभा निवडणुकीत आम्ही त्यांचे काम केले. पण शिंदे गटाच्या स्थानिक आमदार, खासदारांनी भाजपाची कृतज्ञता व्यक्त केली नाही, अशी नाराजी शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
No comments:
Post a Comment