केईएममध्ये हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 July 2024

केईएममध्ये हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया


मुंबई - हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या एका रुग्णाला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी जीवनदान दिले आहे. या रुग्णावर नुकतीच हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. केईएम रुग्णालयात प्रथमच अशी शस्त्रक्रिया करण्यात आली. हृदय प्रत्यारोपणासारखी अत्यंत क्लिष्ट आणि आव्हानात्मक शस्त्रक्रिया सुरू करणारे केईएम हे भारतातील एकमेव महानगरपालिका रुग्णालय ठरले आहे. केईएम रुग्णालयात हृदय आणि यकृत प्रत्यारोपण उपक्रमही राबविण्यात येत आहेत. (Successful heart transplant surgery in KEM)

केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या या रुग्णाला बऱ्याच दिवसांपासून हृदयाचा विकार होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता त्याच्या हृ़दयाचे प्रत्यारोपण करणे हाच एकमेव पर्याय होता. सुदैवाने अवयव दाता उपलब्ध झाल्याने संबंधित रुग्णावर हृदय प्रत्यारोपण करण्याचे निश्चित झाले. प्रत्यारोपण प्रक्रियेतील क्लिष्टता लक्षात घेता हृदय दाता आणि रुग्ण दोघांचेही रितसर समुपदेशन करण्यात आले. हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून रुग्णाची तब्येत आता स्थिर आहे. या रुग्णाला हृदय देणाऱ्या दात्याचे, त्याच्या कुटुंबियाचे तसेच ही हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करणारे हृदय शस्त्रक्रिया विभाग प्रमुख डॉ. उदय जाधव, केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, सर्व डॉक्टर, परिचारिका आणि संबंधित सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी पालिका प्रशासनाच्यावतीने कौतूक करत आभारही मानले आहेत.  

केईएम रुग्णालयामध्ये सन १९६३-६४ मध्ये पहिल्यांदा हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दुर्दैवाने ती यशस्वी होऊ शकली नाही. त्यामुळे त्यानंतरची अनेक दशके प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करता आल्या नाहीत. ही बाब अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर हा विषय प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. केवळ संसाधनांच्या उपलब्धतेने यात यश येणे शक्य नव्हते तर उपलब्ध वैद्यकीय मनुष्यबळालाही यासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे होते. त्यामुळे, डॉ. शिंदे यांनी सर्वप्रथम महानगरपालिकेच्या संपूर्ण आरोग्य प्रशासनाला विश्वासात घेऊन त्यांना या उपक्रमासाठी प्रोत्साहन दिले. त्यासाठी वारंवार विचारमंथन केले. विशेषतः केईएम रुग्णालयातील वैद्यकीय चमूला विश्वासात घेऊन अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रोत्साहित केले.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. शिंदे यांच्या खंबीर प्रोत्साहनामुळे आरोग्य यंत्रणेचा आत्मविश्वास दुणावला आणि केईएममध्ये हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया उपक्रम सुरू करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या. दिनांक १५ ऑक्टोबर २०२३ रोजी यासाठी प्रशासनाला तात्पुरता परवाना (प्रोव्हिजनल लायसन्स) मिळाला. त्यानंतर हृदय शस्त्रक्रियेसाठी आवश्यक उपकरणे आणि सामग्री खरेदी करण्यात आली. यासाठी डॉ. सुधाकर शिंदे यांनी तब्बल ४० पेक्षा जास्त बैठका घेऊन हा उपक्रम राबविण्यासाठी तसेच त्यासाठी आवश्यक सर्व उपकरणे घेण्यासाठी विचारमंथन केले, पाठपुरावा केला. त्यानंतर २० पेक्षा जास्त अत्यंत उच्च दर्जाची वैद्यकीय उपकरणे घेऊन तसेच अत्यंत अनुभवी आणि समर्पक वैद्यकीय चमूंच्या साहाय्याने सुसज्ज विभाग कार्यान्वित करण्यात झाला आहे.

हृदयाच्या अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रियेचे गांभीर्य लक्षात घेता हृदय प्रत्यारोपण उपक्रम सुरू करण्यासाठी तज्ज्ञ आणि अनुभव वैद्यकीय चमूची आवश्यकता होती. यासाठी हृदय विकारासंबंधीत तज्ज्ञ तसेच अत्यंत अनुभवी असलेले डॉ. प्रवीण कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली. अतिरिक्त आयुक्तांची दूरदृष्टी आणि प्रशासकीय तत्परतेने केईएम रुग्णालयात हृदय प्रत्यारोपण उपक्रम सुरू झाला आहे. याचेच फलित म्हणजे केईएम रुग्णालयात नुकतीच करण्यात आलेली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होय. हृदय प्रत्यारोपणाची अत्यंत क्लिष्ट आणि आव्हानात्मक शस्त्रक्रिया करू शकणारे केईएम हे देशातील एकमेव महानगरपालिका रुग्णालय ठरले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad