मुंबईला पावसाने झोडपले, जनजीवन विस्कळीत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 July 2024

मुंबईला पावसाने झोडपले, जनजीवन विस्कळीत


मुंबई - शनिवारी नवी मुंबई ठाणे आणि पनवेलसह कोकणला पावसाने झोडपून काढले होते. त्यानंतर रविवारी रात्री पासून मुंबईत मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम होऊन मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले. पावसाचे पाणी साचल्याने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. (Rain lashed Mumbai)

६ तासात ३०० मिलिमीटर पाऊस - 
रविवार ते सोमवार सकाळी ८ वाजेपर्यंत २४ तासात शहर विभागात ११०.१०, पूर्व उपनगरात १५०.५४ तर पश्चिम उपनगरात १४६.३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रात्री १ ते सकाळी ७ वाजेपर्यंत ३०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सायन, माटुंगा गांधी मार्केट,  दहिसर, बोरिवली, दादर, घाटकोपर पंतनगर, अंधेरी आदी सखल भागात पाणी साचले. 

रात्रभर भांडुप, कुर्ला, सायन, बदलापूर आदी स्थानकादरम्यान पाणी साचल्याने रेल्वे सेवा ठप्प झाली होती. रेल्वे सेवा ठप्प झाल्याने स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली. रेल्वे बंद असल्याने प्रवाशांना चालत आपले नियोजित स्थान गाठावे लागले. पावसाचा हार्बर मार्गालाही फटका बसला. वाशी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सेवा काही काळ ठप्प झाली होती. आवश्यकता असल्यास घराबाहेर पडा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले होते. 

शाळांना सुट्टी - 
कुर्ला एल बी एस रोड, दहिसर सबवे, अंधेरी सबवे, मालाड साईनाथ सबवे, कुर्ला शिवसृष्टी, गांधी मार्केट, गोवंडी स्टेशन रोड आदी ठिकाणी पाणी साचल्याने बेस्टची वाहतूक वळवण्यात आली. सकाळी पावसाचा जोर कायम असल्याने सकाळी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली.

आवश्यकता असल्यास घराबाहेर पडा - 
सध्या मध्य रेल्वे पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. दुपारी समुद्राला मोठी भरती असून त्यावेळी पाऊस पडल्यास रुळावर साचलेले पाणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आवश्यकता असल्यास घराबाहेर पडा असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले.
 
अफवांवर विश्वास ठेवू नका -
पालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला भेट देवून पावसाचा आढावा घेतला. यावेळी मुंबईत सुरू असलेल्या सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महापालिकेची सर्व यंत्रणा मुंबईकरांच्या सेवेसाठी सुसज्ज आहे. पालिकेचे सर्व कर्मचारी घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपतकालीन परिस्थितीत तात्काळ मदतीसाठी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयुक्तांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad