Zika Virus - झिकापासून गर्भवतींची काळजी घ्या, केंद्राच्या राज्यांना सूचना - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 July 2024

Zika Virus - झिकापासून गर्भवतींची काळजी घ्या, केंद्राच्या राज्यांना सूचना



नवी दिल्ली – सध्या झिका व्हायरसचा (Zika Virus) प्रभाव वाढत चालला असून हा विषाणू गर्भवती महिलांसाठी धोकादायक असल्याने झिकाचा संसर्ग झालेल्या गर्भवती महिलांची विशेष काळजी घ्या, अशा सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना दिल्या आहेत. (Protect pregnant women from Zika)

गर्भवती महिलांची काळजी घेण्याच्या सूचना -
देशाच्या काही भागात झिकाचे रुग्ण आढळू लागताच केंद्रीय आरोग्य खाते अलर्ट मोडवर आले आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थे मध्ये झिकाच्या संशयित रुग्णांचे रक्ताचे १०६ नमुने तपासण्यासाठी आले होते. त्यातील सर्वाधिक ८६ महाराष्ट्रातील होते. तर इतर पंजाब, बिहार, बडोदा , सिल्वासा आदी ठिकाणचे होते. त्यानंतर आरोग्य खात्याने झिकाची लागण झालेल्या गर्भवती महिलांची काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा वाढवा -
झिकाबाधित गर्भवती महिलांच्या गर्भाच्या वाढीचे वेळोवेळी निरीक्षण करा. तसेच संपूर्ण परिसर एडीस डासमुक्त ठेवण्यासाठी ,आवश्यक त्या उपाययोजना करा. निवासी क्षेत्रे,कामाची ठिकाणे, शाळा ,बांधकाम साईट्स ,आणि अन्य संस्थामध्ये व्हेक्टर नियंत्रक व्यवस्था वाढवा आणि वेळोवेळी संशयितांच्या रक्त चाचण्या करा. त्याबाबतच्या अहवालावर लक्ष ठेवा आणि आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा वाढवा अशा केंद्राने सर्व राज्यांना सूचना केल्या आहेत.

आरोग्य सुविधा आणि देखरेख -
आरोग्य सुविधांनी आपल्या परिसरात एडीस डासापासून मुक्त ठेवण्यासाठी एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, राज्यांनी निवासी भाग, कामाची ठिकाणे, शाळा, बांधकाम स्थळे, संस्था आणि आरोग्य सुविधांमध्ये कीटकशास्त्रीय देखरेख बळकट करावी आणि रोगवाहक सूक्ष्मजीव प्रतिबंधक उपक्रम जास्तीत जास्त प्रमाणात राबविण्याबाबत प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

जनजागृती आणि आयईसी संदेश -
समाजामध्ये भीती कमी करण्यासाठी आणि जनजागृती वाढवण्यासाठी समाजमाध्यमे आणि इतर मंचांवर सावधगिरीचे आयईसी संदेश देण्याचे आवाहन राज्यांना करण्यात आले आहे. झिका विषाणूचा संबंध गर्भाच्या वाढीशी असल्याने विशेष काळजी घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

झिका विषाणू चाचणी सुविधा -
झिका चाचणी करण्याची सुविधा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (NIV), पुणे, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC), दिल्ली आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या निवडक विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळांमध्ये उपलब्ध आहे.

झिका विषाणूविषयी माहिती -
झिका हा डेंग्यू आणि चिकुन गुनिया सारखा एडिस डासांमुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. हा आजार विशेष घातक नसला तरी झिका प्रभावित गर्भवती महिलांमध्ये जन्मलेल्या बाळांच्या मायक्रोसेफली (मेंदूचा आकार लहान असणे) या स्थितीशी संबंधित आहे. भारतात 2016 मध्ये गुजरात राज्यात प्रथम झिका विषाणूच्या संसर्गाची नोंद झाली होती. 2024 मध्ये (2 जुलैपर्यंत) महाराष्ट्रात पुणे (6), कोल्हापूर (1) आणि संगमनेर (1) येथे झिका विषाणूच्या 8 रुग्णांची नोंद झाली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad