वीज चोरी करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात पालिकेची कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 July 2024

वीज चोरी करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात पालिकेची कारवाई


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई महानगरातील अनधिकृत फेरीवाल्यांचे निष्कासन करण्याची कारवाई मागील काही दिवसांपासून तीव्र करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान अनेक ठिकाणी फेरीवाल्यांनी विजेच्या खांब्यांवरून वीज चोरी करण्याच्या उद्देशाने अनधिकृतरित्या जोडणी घेतल्याचे निदर्शनास आले आहे. आज (दिनांक ४ जुलै २०२४) दादर रेल्वे स्थानक परिसर, भायखळा, चेंबूर, बोरिवली, मुलुंड आणि अंधेरी परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई करताना या अनधिकृत वीज जोडणी खंडित करण्यात आल्या आहेत. तसेच या कारवाईदरम्यान अनधिकृतपणे व्यवसाय मांडलेल्या फेरीवाल्यांकडून मोठ्या प्रमाणात साधनसामुग्रीही जप्त करण्यात आली आहे. 

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, अनधिकृत फेरीवाले, बेवारस वाहने, पदपथावरील अतिक्रमणे यावर अधिक कठोर करावी, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. त्यानुसार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे.

मुंबईकरांची सोय व्हावी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने पदपथ आणि रस्त्यांचा वापर करताना अडथळा ठरणारे फेरीवाले तसेच आरोग्यासाठी अपायकारक अशा पद्धतीने उघड्यावर अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ चे कलम ६१ (न) नुसार सार्वजनिक रस्त्यावर दिवाबत्तीची व्यवस्था करणे, सुस्थितीत ठेवणे हे महानगरपालिकेचे कर्तव्य आहे. यानुसार सार्वजनिक रस्त्यावर दिवाबत्ती करण्यात आली आहे. मात्र याच वीज खांब्यांवरून संबंधित अनधिकृत फेरीवाल्यांनी अनधिकृतरित्या वीजजोडणी घेतल्याचे समोर आले आहे. या जोडणीवर हे विक्रेते मोठमोठे दिवे, प्रखर झोताचे दिवे लावत असल्याचे समोर आले आहे. शहर विभागात बेस्टकडून तर उपनगरांमध्ये मे. अदानी एनर्जी लिमिटेड या वीज कंपनीकडून वीज पुरविली जाते.  

अनधिकृत फेरीवाल्यांनी जेथे अतिक्रमण करून व्यवसाय थाटला होता, तेथून जवळच असलेल्या वीज खांब्यावरून, जोडणी पेटीतून (कनेक्शन बॉक्स) अनधिकृतरित्या जोडणी घेतल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत महानगरपालिकेचे पथक आणि अदानी एनर्जी लिमिटेड यांच्या पथकाने संयुक्तरित्या या फेरिवाल्यांवर कारवाई केली. तसेच त्यांच्या अनधिकृत वीज जोडण्याही काढून टाकण्यात आल्या. या धडक कारवाईत बृहन्मुंबई महानगरपालिका, बेस्ट आणि वीज कंपनीच्या पथकांनी सहभाग घेतला. यापुढेही अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात तसेच अनधिकृतरित्या वीज जोडणी घेणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू राहणार आहे.  

विशेष पथकांद्वारे सुरू राहणार कारवाई - 
अनधिकृतपणे वीजचोरी करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत महानगरपालिका प्रशासन बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन (बेस्ट) उपक्रमाला पत्राद्वारे कळविणार आहे. असे प्रकार रोखण्यासाठी बेस्टने मोहीम हाती घ्यावी. तसेच अशा फेरीवाल्यांवर पोलिसांत गुन्हे नोंदविण्याबाबतही महानगरपालिकेकडून कळविण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सर्व विभाग कार्यालयांतही विशेष पथकाची नेमणूक करण्यात येणार आहे. या पथकात सहायक अभियंत्यांचा समोवश असणार आहे. हे पथक विभाग कार्यालयाच्या हद्दीतील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात, वीजचोरांविरोधात कठोर कारवाई करणार आहे.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad