काळ्या फिती लावून डॉक्टरांनी केला निषेध - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 July 2024

काळ्या फिती लावून डॉक्टरांनी केला निषेध


मुंबई - नव्याने येणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या निवासाची व्यवस्था, शिष्यवृत्ती, वेतन वाढ, महागाई भत्ता आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी अनेक आंदोलने केली. मात्र पालिका प्रशासनाकडून काही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे गुरुवारी पालिकेच्या विविध वैद्यकीय महाविद्यालयात काळ्या फिती लावून प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

दरम्यान, निवासी डॉक्टरांच्या मागण्या मान्य केल्या नाही, तर मात्र २२ जुलैपासून साडेतीन हजार निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला असून रुग्णसेवा कोलमडल्यास पालिका प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा पालिकेच्या मार्ड संघटनेने दिला आहे.

पालिकेच्या मार्ड संघटनेने पालिका रुग्णालयाच्या संचालक डॉ‌. नीलम अंद्रादे यांना सूचनापत्र दिले आहे. २२ जुलैपर्यंत जर मागण्या मान्य झाल्या नाहीतर सामूहिक रजेचा इशारा पत्रातून दिला आहे. नायर मार्ड संघटनेच्या सर्व पदाधिकारी आणि नायरचे सर्व निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पालिकेच्या कासव गतीच्या कारभारावर घोषणा देत गुरुवारी नाराजी व्यक्त केली. यावेळी बोलताना नायर मार्डचे अध्यक्ष तथा बीएमसी मार्डचे सरचिटणीस डॉ. अक्षय अशोकराव डोंगरदिवे यांनी सांगितले की, “मागील चार महिन्यात वारंवार पाठपुरावा करूनदेखील मागण्या मान्य झाल्या नाही म्हणून सामूहिक रजेचा निर्णय घेतला आहे.”

केईएम महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी गुरुवारी काळ्या फित लावून काम करत निषेध व्यक्त केला. यावेळी केईएम मार्डचे अध्यक्ष तथा पालिका मार्डचे अध्यक्ष डॉ. गौरव नाईक यांनी म्हटले की, “अत्यंत निराशाजनक बाब आहे की, दरवेळी निवासी डॉक्टरांना त्यांच्या हक्कासाठी आंदोलनाचे पाऊल उचलावे लागत आहे.”

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad