मुंबई - विधवा महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप हा स्तुत्य उपक्रम आहे. त्यामुळे प्रत्येकीचे अभिनंदन करते. शिलाई यंत्र तुमच्या हाती पडले आहे ते महिला सक्षमीकरणाचा पहिलं पाऊल आहे. ॲड. सुशीबेन शाह यांनी हा उपक्रम राबवून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम व स्वतंत्र करण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल टाकले आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
स्वयंरोजगार योजना मुंबई शहर अंतर्गत आणि शिवसेना प्रवक्त्या ॲड. सुशीबेन शाह यांच्या प्रयत्नाने 'विधवा महिलांकरिता मोफत शिलाई मशीन वाटप' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ताडदेव रोड येथील साने गुरुजी मार्ग, बने कंपाऊंड मधील शासकीय शाळा बिल्डिंग येथे शनिवारी हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी एकूण ६० शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुरुवातीला रिक्षा चालवायचे. त्यातून त्यांनी झेप घेत राज्याचे मुख्यमंत्री बनले. आता शिलाई मशीन वाटप केलेल्या महिला सुद्धा अशीच दैदिप्यमान कामगिरी करतील, असा आशावाद व्यक्त करत राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी ॲड. सुशीबेन शाह यांच्या कामाचे कौतुक केले.
महायुती सरकारने तुम्हाला एक सन्मान चिन्ह दिले आहे. आता ६० महिलांना शिलाई मशीनचा लाभ मिळणार आहे. तसेच त्यांना शिलाई प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याचबरोबर महिलांना बजाज इन्शुरन्सचा तीन लाखाचा विमा दिला जाणार आहे. मुख्यमंत्री साहेबांनी महिलांसाठी योजना राबवल्या आहे. योजनेबाबत ज्यांना अडचण असेल त्यांनी माझ्याशी संपर्क करा. योजनेचा पुरेपूर फायदा घ्या. एकत्र या, स्त्रीशक्ती निर्माण करा, असे वक्तव्य राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा व शिवसेना प्रवक्त्या ॲड. सुशीबेन शाह यांनी केले. याप्रसंगी, महिला बाल विकास अधिकारी शोभा शेलार, नगरसेवक दत्ता नरवणकर व दिलीप नायक आदींची उपस्थिती होती.
महिला आणि पुरूष दोघांनी मिळून लोकशाहीला पुढे न्या!-
महिलांना शिवणकामात गुंतवणे हे रोजगाराच्या दृष्टीने पहिले पाऊल आहे. आता महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे गेल्या आहेत. महिलांना अजून प्रोत्साहन दिले पाहिजे, जेणेकरून लोकशाही अजून बळकट होईल. महिला आणि पुरूष दोघांनी मिळून लोकशाही पुढे न्यायची आहे असे गोरे म्हणाल्या.
महिलांनी ही खबरदारी घ्यावी! -
मशीनवर बसणे अवघड काम आहे. कारण, मशीनच्या सुईत धागा टाकणं कठीण काम असते. महिलांनी मशीनवर बसण्याआधी डोळे तपासून घ्या. महिलांनी कोणत्याही परिस्थितीत मशीन विकू नये. मशीनचा योग्य वापर करावा. तसेच मशीन चालवताना फोनवर बोलणे टाळा, ही महिलांनी खबरदारी घ्यावी असे गोरे म्हणाल्या.
No comments:
Post a Comment