नवी मुंबई - जुळ्या मुलांच्या उपचाराचे पैसे देण्यासाठी नेरुळमधील तेरणा रुग्णालयाने तगादा लावल्याने नरेंद्र गाडे नामक व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत घडली. मृत नरेंद्र गाडे यांनी मृत्यूपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीमध्ये त्यांच्या मृत्यला तेरणा हॉस्पीटल जबाबदार असल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणी नवी मुंबईतील तेरणा रुग्णालयाविरोधात नेरुळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
नरेंद्र गाडे हे नवी मुंबईमध्ये राहतात. लग्नाला अनेक वर्ष उलटूनही त्यांना मुलबाळ नव्हते. देवाच्या कृपेने तब्बल १४ वर्षांनी त्यांच्या घरी पाळणा हलला होता. गाडे यांच्या पत्नीने जुळ्या मुलांना जन्म दिला होता. मात्र दोन्ही बाळांची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नेरुळमधील तेरणा रुग्णालयामध्ये या चिमुकल्यांवर उपचार सुरू होते. मात्र रुग्णालयाने गाडे यांच्याकडे बील भरण्यासाठी तगादा लावला होता. रुग्णालयाच्या याच त्रासाला कंटाळून गाडे यांनी राहत्या घरात गळफास घेत आपले आयुष्य संपवले. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, मृत नरेंद्र गाडे यांचे नातेवाईक व भिम आर्मी संघटनेने तेरणा हॉस्पीटलवर जोपर्यंत गुन्हा दाखल करुन ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत नरेंद्र गाडे यांच्यावर अंत्यसंस्कार न करण्याची भुमिका घेतली होती. त्यामुळे नेरुळ पोलिसांकडून तेरणा हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करण्यात आला. नरेंद्र गाडे यास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तेरणा रुग्णालयाला जाब विचारण्यासाठी भीम आर्मीने येत्या ३ ऑगस्ट रोजी नेरुळच्या तेरणा रुग्णालयावर धडक मोर्चाचे आयोजन केले आहे
No comments:
Post a Comment