मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात विविध नागरी विकास प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे प्रकल्पबाधितांची संख्या वाढत असल्याने त्यांच्याकडून सदनिका, अनिवासी गाळ्यांची मागणी वाढत आहे. मुंबई शहरात 2017 पासून 4870 प्रकल्पबाधितांना घरे देण्यात आली आहेत. मुंबई शहरातील प्रकल्पबाधितांना घरे देण्यासाठी शासन सकारात्मक असून म्हाडासमवेत बैठक घेण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.
याबाबत सदस्य विद्या ठाकूर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर बोलताना मंत्री सामंत म्हणाले की, प्रकल्पबाधितांना मुलुंड येथे 6 हजार 90 घरे देण्यात आली असून भांडूप येथेही घरे बांधून देण्यात येत आहे. गोरेगाव येथील 700 प्रकल्पबाधितांबाबत म्हाडासोबत बैठक घेवून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.
महानगरपालिकेच्या अत्यावश्यक प्रकल्पामध्ये प्रथम व द्वितीय प्राधान्य क्रमांक असलेल्या प्रकल्पबाधितांना सदनिकेऐवजी 25 लाखांचा आर्थिक मोबदला, तर तृतीय प्राधान्य क्रमातील बाधितांना किमान 25 ते कमाल 40 लाख रुपये इतका आर्थिक मोबदला देण्यात येतो. आर्थिक मोबदला वाढवून देण्याबाबत यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेचे आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गठित समन्वय समितीसमवेत चर्चा करण्यात येईल.
अनिवासी प्रकल्पबाधितांना जागेच्या उपलब्धतेनुसार व प्रकल्पबाधितांच्या पसंतीनुसार अनिवासी जागेचे वाटप करण्यात येते. अनिवासी प्रकल्पबाधितांस उपलब्ध जागा पसंत न पडल्यास आर्थिक मोबदल्याचे अधिदान संबंधित विभागस्तरावर करण्यात येते, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment