टीम इंडियाच्या विजयी परेडमध्ये चेंगराचेंगरी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 July 2024

टीम इंडियाच्या विजयी परेडमध्ये चेंगराचेंगरी

मुंबई - तब्बल १७ वर्षांनंतर टी २० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाचे भारतात जंगी स्वागत करण्यात आले. टीममधील सदस्यांची मुंबईत मिरवणूक काढून वानखडे स्टेडियमवर सत्कार करण्यात आला. यासाठी मरीनलाईन परिसरात क्रिकेट प्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या गर्दीत अनेक ठिकाणी चेंगराचेंगरी झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गर्दीत सुमारे १२ मुले बेपत्ता झाली तर नऊ जण गर्दीत श्वास कोंडल्याने बेशुद्ध झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून टीम इंडिया टी २० विश्वविजेती बनली. अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर टीम इंडियाने भारतीय क्रिकेट चाहत्यांना आनंद दिला. विश्वविजेत्या टीममधील सदस्यांचा मुंबईत वानखडे स्टेडियमवर सत्कार करण्यात आला. त्याआधी टीम इंडियाच्या सदस्यांची वानखडे स्टेडियमपर्यंत ओपन डेक बसमधून मिरवणूक काढण्यात आली. आपल्या लाडक्या टीम इंडियामधील सदस्यांची एक झलक पाहण्यासाठी हजारो क्रिकेट रसिकांनी मरिन ड्राईव्ह परिसरात गर्दी केली होती. कार्यक्रम संपल्यावर क्रिकेट रसिक घरी परतल्यावर रस्त्यावर चपलांचा खच पडला होता.

मरिन ड्राईव्ह परिसरात क्रिकेट रसिकांनी प्रचंड गर्दी केली होती. या गर्दीत अनेकांची ओढाताण झाली. अनेकांना धक्काबुक्की झाली. अनेकांना गर्दीत श्वास घ्यायला त्रास होऊ लागला होता. एका तरुणीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यावर पोलिसाने तिला खांद्यावर घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गर्दीमुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास झाला. त्यापैकी नऊ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad