१०८ रुग्णवाहिकेचा १० वर्षात १ कोटी रूग्णांना लाभ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 July 2024

१०८ रुग्णवाहिकेचा १० वर्षात १ कोटी रूग्णांना लाभ



मुंबई - आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत ‘डायल 108’ ही रूग्णवाहिका सेवा अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या या सेवेने राज्यातील नागरिकांची आरोग्य सेवा करीत तब्बल 10 वर्ष पूर्ण केले आहे. या 10 वर्षाच्या कालावधीत 108 रूग्ण्वाहिकेची सेवा रूग्णांना जीवनदान देणारी ठरली आहे. अशा या संजीवनी देणाऱ्या रूग्णवाहिका सेवेने राज्यात 1 कोटी 3 हजार 446 रूग्णांची विनामूल्य आरोग्य सेवा केली आहे.

कुणी आजारी असेल, अपघात झाला असेल किंवा वैद्यकीय सेवेची मदत असेल तर 108 रूग्णवाहिका सेवेसाठी तत्पर असते. आपत्कालीन आरोग्य सेवांसाठी ‘एक-शून्य-आठ’ हा विनामूल्य दूरध्वनी क्रमांक आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, सार्वजनिक आरोग्य विभाग व भारत विकास ग्रुपच्या (बीव्हीजी इंडिया) संयुक्त विद्यमाने ही सेवा अव्याहतपणे राज्यात ठिकठिकाणी चालविण्यात येत आहे. महाराष्ट्रात या सेवेची सुरूवात जानेवारी 2014 मध्ये झाली. राज्यात सध्या 937 रूग्णवाहिका असून सर्व रूग्णवाहिकेत पल्स ऑक्स‍िमीटर, मेडीकल ऑक्सिजन यंत्रणा सज्ज आहे. ही देशातील अविरत 24 तास डॉक्टर व अत्यावश्यक वैद्यकीय सुविधेसह असणारी एकमेव यंत्रणा आहे. राज्यात 108 रूग्णवाहिकेमध्ये 40 हजार 213 प्रसुती करण्यात येऊन त्यांना सुखरूप सोडण्यात आले आहे. तसेच 4 हजार 34 रूग्णांना कृत्रिम श्वासोच्छवास (व्हेंटीलेटर) ची सुविधा देण्यात येऊन त्यांचे प्राण वाचविण्यात आले आहे.

राज्यात कोणत्याही ठिकाणावरून मोबाईल अथवा दूरध्वनीवरून 108 क्रमांक डायल करताच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रूग्णांना विनामूल्य आणि वेळेत रूग्णवाहिका सेवा देण्यात येते. सेवा सुरू झाली तेव्हापासून, जून 2024 पर्यंत अपघाती घटनांमध्ये रूग्णवाहिकेमधून 5 लाख 22 हजार 682 रूग्णांना उपचारासाठी रूग्णालयात पोहचविण्यात आले आहे. तसेच आगीच्या घटनांमध्ये 29 हजार 253, हृदयरोगमध्ये 75 हजार 593, उंचावरून पडून जखमी झालेल्या 1 लाख 58 हजार 684, विषबाधा प्रकरणी 2 लाख 32 हजार 426, प्रसुतीवेळी 16 लाख 56 हजार 94, शॉक किंवा वीज पडून जखमी या घटनांमध्ये 6 हजार 949 रूग्णांना सेवा देण्यात आली आहे. अशा प्रकारे राज्यात 1 कोटी 3 हजार 446 रूग्णांना आरोग्य सेवा 108 च्या माध्यमातून मिळाली आहे. महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा या नावाने असलेल्या 108 ही रूग्णवाहिका सेवा सुरू आहे.

याव्यतिरिक्त राज्यात नाशिक येथील महाकुंभमेळा कालावधीत 1 लाख 7 हजार 200 रूग्णांना सेवा दिली. महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या पंढरपूरच्या वारीमध्ये 2 लाख 89 हजार 646 आणि गणपती उत्सवात 4 हजार 684 रूग्णांना 108 ने सेवा दिली आहे. या सेवेमध्ये सुधारणा करण्यासाठी किंवा सेवेच्या समाधानाबाबत नागरिकांचा प्रतिसाद (फिडबॅक) देखील घेण्यात येतो. राज्यात सेवेबद्दल 6 लाख 74 हजार 542 प्रतिसाद प्राप्त झाले आहे. यामध्ये 81 हजार 155 एकदम उत्तम, 5 लाख 70 हजार 594 उत्तम आणि 22 हजार 793 चांगला प्रकारातील आहे. राज्यात 108 रूग्ण्वाहिका सेवा संजीवनी आहे. गरीब रुग्णांना या सेवेमुळे वेळेत उपचार मिळण्यासाठी मोलाची मदत झाली आहे. त्यामुळे त्यांना संजीवनीच मिळाली आहे. ही सेवा कोरोना काळात जीवनदायी ठरली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad