पुणे - पुण्यातील कल्याणी नगर येथे एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने आलिशान पोर्शे कारने दोघांना उडविले या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. यानंतर पुण्यातील आळंदी येथे पोर्शे कार अपघाताची पुनरावृत्ती झाली आहे. ही घटना वडगाव घेनंद येथे घडली आहे. एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात चारचाकी गाडी चालवून महिला आणि तिथे जमलेल्या लोकांच्या अंगावर घालून जिवास हानी पोहचवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले आहे. (Pune News) (Pune Accident)
याबाबत नाजुका रणजित थोरात यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना तीन दिवसांपूर्वी शनिवारी (दि.15) घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आळंदी आणि परिसरात खळबळ उडाली आहे. पुण्यातील पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा गावात आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव घेनंद मधील गणेश नगरमध्ये फिर्यादी महिला राहते. फिर्यादी थोरात यांचे अल्पवयीन मुलासोबत पूर्वी वाद झाले होते. या वादाच्या रागातून मुलाने हे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अल्पवयीन मुलाने त्याच्या ताब्यातील कार (एमएच 14 एचडी 5749) जोरात चालवून नाजुका थोरात यांच्या अंगावर गाडी घातली. मात्र, त्या बाजूला झाल्याने थोडक्यात वाचल्या. त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत.
व्हायरल व्हिडीओमध्ये ज्या रस्त्यावरुन मुलाने गाडी चालवली त्या रस्त्यावर आणखी पाच ते सहा नागरिक होते. त्यातील दोघांच्या हातात लाकडी दांडकेही होते. भांडणाचा प्रकार सुरु असताना मुलाने त्याच्या ताब्यातील कार शंभर मीटर अंतर मागे नेली. त्यानंतर पुन्हा वेगाने कार पुढे चालवून घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एक वृद्ध देखील होता. भरधाव वेगात कार येत असल्याचे पाहून नागरिक बाजूला झाले. त्यानंतर मुलाने फिर्यादी यांच्या अंगावर गाडी घातली. फिर्यादी यांना गाडीचा धक्का लागल्याने त्या किरकोळ जखमी झाल्या. त्यानंतर आरोपी तिथून निघून गेला.
अल्पवयीन मुलाने पुढे जाऊन कारच्या टपावर उभे राहून अंगातील शर्ट काढला. त्यानंतर फिर्यादी महिलेकडे पाहून शिवीगाळ केली. आळंदी पोलिसांनी अल्पवयीन मुलावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून बाल न्यायालयाने त्याची रवानगी बाल सुधारगृहात केली आहे.
No comments:
Post a Comment