मुंबई - ‘दहिसर-अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर-गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांवरील दैनंदिन प्रवासी संख्या दोन लाख ६० हजार ४७१ वर पोहोचल्याची तर गेल्या आठवड्यात या दोन्ही मार्गिकांवरील एकूण प्रवासी संख्येने दहा कोटींचा पल्ला गाठल्याची माहिती महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाकडून (एमएमएमओसीएल) देण्यात आली.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकेवरील २० किमी लांबीचा दहिसर – डहाणुकरवाडी – आरे दरम्यानचा पहिला टप्पा एप्रिल २०२२ मध्ये सेवेत दाखल केला. जानेवारी २०२३ मध्ये दुसरा टप्पा सेवेत दाखल झाला आणि ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिका कार्यान्वित झाली. ही मार्गिका कार्यान्वित झाल्यानंतर प्रवाशांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. सुरुवातीला काही हजारांवर असलेली दैनंदिन प्रवासी संख्या हळूहळू लाखांवर गेली. आतापर्यंत या दोन्ही मार्गिकांवरून दिवसाला दोन लाख ३० हजार प्रवासी प्रवास करीत होते. पण आता मात्र यात वाढ झाली असून दैनंदिन प्रवासी संख्या दोन लाख ६० हजार ४७१ वर पोहोचली. गेल्या आठवड्यात या दोन्ही मार्गिकांवरील एकूण प्रवासी संख्येने दहा कोटींचा पल्ला गाठल्याची माहिती मेट्रो संचलन महामंडळाकडून देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment