कायद्याची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्याची प्रसार माध्यमांची मोठी जबाबदारी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 June 2024

कायद्याची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्याची प्रसार माध्यमांची मोठी जबाबदारी



मुंबई - विविध राज्यांचे विधिमंडळ व संसद आवश्यकतेनुसार कायद्यांची निर्मिती करीत असते. या कायद्यांच्या अंमलबजावणीतून नागरिकांचे जीवन सुसह्य करण्याचा उद्देश असतो. नवीन कायदा, वेळोवेळी कायद्यात झालेले बदल आणि बदलाची असणारी आवश्यकता याबाबतची माहिती समाजापर्यंत आणि शासनापर्यंत पोहोचविण्याची मोठी जबाबदारी प्रसार माध्यमांची असल्याचे प्रतिपादन करीत या कार्यशाळेतील मार्गदर्शनाचा विधिमंडळ कामकाजाचे वार्तांकन करणाऱ्या प्रसार माध्यम प्रतिनिधींना निश्चितच उपयोग होणार असल्याचा विश्वास माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी आज व्यक्त केला. (Marathi latest News)

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयातील वार्ताहर कक्षात माध्यम साक्षरता अभियानांतर्गत ‘ओळख विधिमंडळ कामकाजाची’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. उद्घाटनीय कार्यक्रमात महासंचालक सिंह बोलत होते. कार्यक्रमास व्यासपीठावर प्रमुख वक्ते म्हणून विधिमंडळ सचिवालयाचे सचिव (1) जितेंद्र भोळे, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, कार्यवाह प्रवीण पुरो, संचालक (प्रशासन) हेमराज बागुल, संचालक (माहिती) डॉ. राहुल तिडके उपस्थित होते.

जगभरात बातमीचा प्राथमिक स्त्रोत समाजमाध्यमे झाली असल्याचे सांगत महासंचालक सिंह म्हणाले, केवळ बातमीचाच नाही, तर बातमीच्या खात्रीचा स्त्रोतही समाजमाध्यमे झाली आहेत. समाज माध्यमांवर पोस्ट केलेल्या मजकूराप्रती समाजमाध्यम जबाबदार नसते, तर प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या बातमीप्रती माध्यमे जबाबदार असतात. त्यामुळे समाज माध्यमांच्या गर्दीतही वृत्तपत्रे, वाहिन्या यांचे महत्व अबाधित आहे. माध्यम प्रतिनिधींना विधिमंडळ कामकाजाचे वार्तांकन करताना सदस्यांच्या विशेषाधिकाराला धक्का लागणार नाही, याची दक्षताही घ्यावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोड म्हणाले, माध्यमांमध्ये आलेल्या नवपत्रकारांना विधिमंडळ कामकाजाचे वार्तांकन करताना माहितीअभावी बऱ्याच अडचणी येत असतात. अशा नवपत्रकारांना या कार्यशाळेतील मार्गदर्शनाचा निश्चितच वार्तांकन करताना लाभ होणार आहे. कामकाजाचे वार्तांकन करणाऱ्या प्रसार माध्यम प्रतिनिधींना पात्रता ठरविणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

प्रास्ताविकात संचालक हेमराज बागुल म्हणाले, लोकशाहीच्या गुणात्मक वाढीसाठी चौथा स्तंभ असलेल्या प्रसार माध्यमांच्या गुणवत्ता वाढ होणे गरजेची आहे. विधिमंडळातील कामकाज जनतेपर्यंत पोहोचविण्याची माध्यमांची जबाबदारी मोठी आहे. माध्यमांची गुणवत्ता वाढल्यास लोकशाही गुणात्मकदृष्ट्या सुदृढ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सूत्रसंचलन पल्लवी मुजुमदार यांनी तर आभार वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी मानले. कार्यक्रमास माध्यम प्रतिनिधी, महासंचालनायाचे अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad