निवडणुकीनंतर कामावर रुजू न झालेल्या पालिका कर्मचाऱ्यांवर कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 June 2024

निवडणुकीनंतर कामावर रुजू न झालेल्या पालिका कर्मचाऱ्यांवर कारवाई


मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले होते. निवडणूक आयोगाने आपल्या कामातून या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले आहे. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी पालिकेत आपल्या नोकरीच्या ठिकाणी रुजू होणे गरजेचे होते. मात्र निवडणूक कामासाठी गेलेल्या 11 हजार 851 कर्मचाऱ्यांपैकी 4 हजार 393 कर्मचारी कामावर हजर झालेले नाहीत. कामावर हजर न झालेल्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात ७ तर महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान झाले. ४ जून रोजी मतमोजणी झाली. निवडणूक, मतदान आणि मतमोजणीची कामे करण्यासाठी पालिकेच्या तब्बल 11 हजार 851 कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले होते. पालिकेच्या या कर्मचाऱ्यांना मतमोजणी झाल्यावर निवडणुकीच्या कामातून कार्यमुक्त करण्यात आले. तसे अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले होते. त्यानुसार अहवालही प्राप्त झाले.

त्यानंतर निवडणूक आयोगाने शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या कार्यक्रम घोषित केला असून सदर निवडणूक 26 जून 2024 रोजी घेण्यात येणार आहे. या कामासाठी काही अंशी अत्यंत कमी कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत आहेत. ते पूर्ण वेळ नाहीत. आपल्या मूळ कार्यालयाचे कामकाज सांभाळून आठवड्यातील फक्त दोन दिवस काही वेळ निवडणूक कामकाजावर आहेत. यामध्ये आपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवा सोडून इतर विभागाचा समावेश आहे.

असे असताना पालिकेचे 11 हजार 851 कर्मचाऱ्यांपैकी 4 हजार 393 कर्मचारी कामावर हजर झालेले नाहीत. हे कर्मचारी कामावर हजर झाले नसल्याने प्रशासनाकडून कारवाई सुरु करण्यात आली आहे. कामावर रुजू न झालेल्या 123 कर्मचाऱ्यांचं वेतन मुंबई महापालिका प्रशासनाने रोखलं आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad