मुंबई - डेंगी (Dengue) आणि हिवताप (मलेरिया) (Maleria) आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत लघुपटाच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. ‘भाग मच्छर भाग’ ही विशेष जनजागृती मोहिम मराठी, हिंदी, चित्रपट सृष्टीतील अभिनेते तसेच सेलिब्रिटी, प्रसिध्द व्यक्ती यांचाही सहभाग या मोहिमेसाठी लाभणार आहे. डास प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आवाहन करणारा सेलिब्रिटींमार्फत संदेश व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. (Mumbai News) (Bmc awareness campaign bhag machar bhag)
बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत पावसाळी आजाराबाबत जनजागृती करण्यासोबतच हिवताप आणि डेंगी बाबतीत विशेष उपाययोजना, उपक्रम राबविण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले होते. याचाच एक भाग म्हणून मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते आणि सेलिब्रिटी, प्रसिद्ध व्यक्ती यांच्या मदतीने दृकशाव्य (व्हिडीओ संदेश) फिल्म, फोटो आदींच्या माध्यमातून जनजागृती मोहिम राबविण्यात येणार आहे.
डेंगी आणि हिवताप हा डासांच्या माध्यमातून होणारा आजार आहे. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यावर डासांची उत्पत्ती ही आजाराचा प्रादुर्भाव आणि साथ वाढीचे मूळ कारण आहे. या डासांची उत्पत्ती स्थळे वेळीच नष्ट केली तर डेंगी व हिवताप आजारावर नियंत्रण ठेवणे शक्य होईल, असा संदेश मोहीमेच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
मुंबई महानगरात जनजागृतीसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘भाग मच्छर भाग’जनजागृती मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन हिवताप, डेंगीसारख्या आजारांचे मुंबई महानगरातून निर्मूलन करण्यास मदत करावी असे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी केले आहे.
हिवताप आणि डेंगी प्रतिबंधासाठी उपाययोजना -
1. नागरिकांनी आपल्या घरामध्ये, घराच्या आजूबाजूला व इमारतींच्या परिसरात कुठेही पाणी साचलेले असणार नाही, याची दक्षता घ्यावी. साचलेल्या पाण्यातच डासांची मादी अंडी घालते व डासांची उत्पत्ती स्थळे तयार होतात ही बाब लक्षात घेता साचलेले पाणी आढळून आल्यास असता तात्काळ निचरा करावा.
2. टायर, नारळाच्या करवंट्या, प्लास्टिकच्या बाटल्या व बाटल्यांची झाकणे, झाडांच्या कुंड्या व त्या कुंड्याखालील तबकडी, फ्रीजच्या खालील डिफ्रॉस्ट ट्रे यामध्ये पाणी साचून राहणार नाही, याची दररोज पाहणी करावी व दक्षता घ्यावी.
3. फेंगशुई, मनी प्लांट यासारख्या शोभेच्या रोपट्यांचे पाणी नियमितपणे बदलावे.
4. दिवसा आणि रात्री झोपताना मच्छरदाणी किंवा डास प्रतिबंधात्मक (Mosquito Repellent) औषधांचा वापर करावा.
5. जुने टायर, पाण्याच्या टाक्या, नळ्या, प्लास्टिक कंटेनर यांसारख्या वस्तू जमा करणे टाळावे, अशा अडगळीत पाणी साचून डासांची उत्पत्ती होऊ शकते.
6. ताप आल्यास जवळच्या बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, बृहन्मुंबई महानगरपालिका रुग्णालयात त्वरित संपर्क साधावा व समूळ उपचार पूर्ण करावा.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुढाकाराने सुरु करण्यात आलेल्या ‘भाग मच्छर भाग’या जनजागृती मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कु-हाडे व कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉक्टर दक्षा शहा यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment