महाराष्ट्रासह चार विधानसभा निवडणूक ११ नोव्हेंबरपूर्वी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 June 2024

महाराष्ट्रासह चार विधानसभा निवडणूक ११ नोव्हेंबरपूर्वी



मुंबई - लोकसभा निवडणुकीसोबतच जम्मू आणि काश्मीर विधानसभेची निवडणूक लागेल अशी अपेक्षा होती पण ती झाली नाही. पण आता याची जोरदार तयारी निवडणूक आयोगाकडून सुरु असून यासाठी तारीखही निश्चित झाल्याची माहिती मिळतेय. कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये होणारी ही पहिलीच निवडणूक असणार आहे. विशेष म्हणजे याबरोबरच महाराष्ट्र, हरयाणा आणि झारखंडची निवडणूक देखील जाहीर होणार असून ११ नोव्हेंबरपूर्वी देशातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे.

निवडणूक आयोगाने महाराष्ट्र, जम्मू आणि काश्मीर, हरयाणा आणि झारखंड या चार राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिका-यांना गुरुवारी एक पत्र लिहिले आहे. या पत्रातून निवडणुकीच्या संभाव्य तारखा देण्याची मागणी केली आहे. यानंतर शुक्रवारी काढलेल्या एका निवेदनात, निवडणूक आयोगाने सांगितले की, मतदान केंद्रांची ठिकाणे अधिक सोयीची आणि तर्कसंगत असावीत यासाठी निवडणूक पूर्व विशेष मोहिम २५ जूनपासून सुरू होईल. जुलैच्या कट-ऑफ तारखेसह मतदार याद्या अद्ययावत केल्या जातील. २५ जुलै रोजी प्रारूप याद्या प्रसिद्ध केल्या जातील, त्यानंतर मतदारांना ९ ऑगस्टपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. त्यानंतर अंतिम मतदार यादी वेळापत्रकानुसार २० ऑगस्टपर्यंत जाहीर केली जाईल.

दरम्यान, २०१८ मध्ये बरखास्त झाल्यापासून जम्मू-कश्मीरमध्ये विधानसभा अस्तित्वात नाही, तर हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेचा कार्यकाळ ११ नोव्हेंबर, २६ नोव्हेंबर आणि ५ जानेवारी २०२५ रोजी संपत आहे. त्यामुळे या कार्यकाळांपूर्वीच निवडणुका पूर्ण कराव्या लागतील. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत जम्मू आणि काश्मीरमधील लोकांचा मोठा सहभाग पाहून आयोगाने जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील मतदार याद्या १ जुलै २०२४ पर्यंत अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत असे आयोगाने म्हटले आहे.

कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करताना, सुप्रीम कोर्टाने गेल्या वर्षी निवडणूक आयोगाला जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत घेण्याचे आदेश दिले होते. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले की, निवडणूक पॅनेल निवडणुका घेण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करेल. लोकसभा निवडणुकीत जम्मू-काश्मीरच्या पाच लोकसभा मतदारसंघात एकूण ५८.५८ टक्के मतदान झाले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad