Yoga Day - “योग - स्वत:साठी आणि समाजासाठी," २०२४ साठी संकल्पना - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 June 2024

Yoga Day - “योग - स्वत:साठी आणि समाजासाठी," २०२४ साठी संकल्पना



मुंबई - दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. मुंबईमध्ये यंदाच्या योग्य दिनानिमित्त “योग - स्वत:साठी आणि समाजासाठी" ही संकल्पना राबवली जात आहे. त्यासाठी एकाच दिवसली १०० प्रशिक्षण सत्रांचे आयोजन केले जाणार आहे अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली. (Yoga Day)

मुंबईकरांच्या घड्याळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या दिनक्रमामध्ये आता आरोग्यासाठी महत्व वाढताना दिसून येत आहे. आपल्या दैनंदिन वेळापत्रकात स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ देण्याचा कल मुंबईकरांमध्ये आढळतो आहे. संपूर्ण मुंबईतील बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित शिव योगा केंद्रांवर दिवसेंदिवस वाढणारी प्रशिक्षणार्थी आणि लाभार्थींची आकडेवारी ही अतिशय बोलकी आहे. सर्व विभागातील शिव योगा केंद्रांना मिळणारा प्रतिसाद मुंबईकरांमध्ये आरोग्याचे महत्व अधोरेखित करत आहे. यंदा २१ जून २०२४ आंतराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने संपूर्ण मुंबईतील विभागांमध्ये मिळून १०० प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबईतील नागरिकांच्या सुदृढ आरोग्याचे तसेच दर्जेदार जीवनशैलीसाठी शिव योगा केंद्रांची ज्याठिकाणी मागणी आहे, अशा ठिकाणी नियमितपणे प्रशिक्षण वर्ग घेण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले होते. योगा प्रशिक्षणाचे वर्गाच्या ठिकाणी नागरिकांना नियमितपणे प्रशिक्षण उपलब्ध होईल यासाठीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिल्या होत्या. संपूर्ण मुंबईतील २४ प्रशासकीय विभागांमध्ये सद्यस्थितीला एकूण ११६ शिव योग केंद्र कार्यरत आहेत. या केंद्रांच्या ठिकाणी प्रत्येकी एक यानुसार ११६ योग प्रशिक्षक कार्यरत आहेत. सध्या ४ हजार २७८ लाभार्थी योग प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत. तसेच जून २०२२ पासून ते मे २०२४ अखेरीपर्यंत ३१ हजार ६२३ लाभार्थ्यांनी योग प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली.

जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याच्या संकल्पनेत शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक आरोग्य याला महत्व दिले आहे. सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी तसेच जीवनशैलीशी निगडित मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार इत्यादी आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी औषधोपचारांच्या सोबतच आरोग्यदायी जीवनशैली व योगा मुळे त्याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. वर्ष २०२२ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने संपूर्ण मुंबईत विभाग स्तरावर शिव योगा केंद्रे सुरू केली आहेत.

यंदा आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना, “योग - स्वत:साठी आणि समाजासाठी," ही आहे. योगामुळे केवळ वैयक्तिक आरोग्य सुधारत नाही, तर सामाजिक कल्याणासाठी देखील योगदान महत्वाचे आहे. योग हे वैयक्तिक वाढीसाठी आणि सामाजिक सुधारण्याचे साधन म्हणून प्रोत्साहन देते. वैयक्तिक आणि सामूहिक आरोग्याचे परस्परसंबंध अधोरेखित करते.

आंतराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून सर्वसामान्यांना योगविषयक माहिती व निरोगी आयुष्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याकरिता गतवर्षी संपूर्ण मुंबईभर योग प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले. गतवर्षी मुंबईत २४ विभागात १०० सत्रांचे आयोजन करून २ हजार ५०० नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे. तसेच यंदाच्या वर्षीदेखील सर्व २४ प्रशासकीय विभागात मिळून एकूण १०० प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad