विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत मिळणार..! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 June 2024

विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत मिळणार..!


मुंबई - शाळा - महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना आता एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत. तशा सूचना एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत. (Students will get ST pass directly in school)

नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा आता सुरू झालेल्या आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून 66 टक्के इतकी सवलत दिली आहे, म्हणजे केवळ 33 टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो. त्याचप्रमाणे शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहून पास घ्यावे लागत होते. किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापनाकडून पास घेतले जात असत. पण यंदापासून विद्यार्थ्यांना पास साठी आता रांगेत  ताटकळत उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा - महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्याकडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत. जेणेकरून त्यांचा वेळ वाया जाणार नाही. 

या संदर्भात १८ जुन पासुन एसटी प्रशासनातर्फे "एसटी पास थेट तुमच्या शाळेत" ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे. या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी - विद्यार्थिनींना होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad