मुंबई - आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून आपण रूग्णसेवा करण्याचे ईश्वरीय कार्य करीत आहोत. ही सेवा राज्यात चांगल्या पद्धतीने सुरू आहे. मात्र या सेवेमध्ये आणखी सुधारणा करून बळकट करण्याचे प्रयत्न करण्यात येतील, यासाठी केंद्र शासनाकडून राज्याला संपूर्ण सहकार्य मिळेल, अशी ग्वाही केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण, आयुष (स्वतंत्र कार्यभार) राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज दिली.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री जाधव यांनी आरोग्य भवन येथे राज्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. बैठकीस राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, आमदार संजय रायमुलकर, सचिव नवीन सोना, आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत डांगे, आयुष विभागाचे संचालक प्रा. व्ही. डी रमण घुंगराळेकर, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, राज्य कर्मचारी विमा योजनचे आयुक्त अस्तिककुमार पांडेय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, संचालक डॉ नितीन अंबाडेकर आदी उपस्थित होते.
आयुर्वेदाकडे नागरिकांचा कल वाढत असल्याचे सांगत केंद्रीय राज्यमंत्री जाधव म्हणाले, आयुर्वेदामध्ये आवश्यकतेनुसार नवनवीन अभ्यासक्रम सुरू केले पाहिजे. स्वतंत्र फार्मासिस्ट, स्वतंत्र संशोधनाची व्यवस्था उभारून आयुर्वेदामधील महाविद्यालयांसाठी स्वतंत्र विद्यापीठ निर्माण केले पाहिजे. देशात काही राज्यात स्वतंत्र आयुष विभाग असून राज्यात त्यासाठी प्रयत्न करावेत. आयुर्वेदासाठी आवश्यक असणाऱ्या औषधी वनस्पतींची लागवड वाढली पाहिजे. त्यासाठी ‘हर्बल गार्डन’ ही संकल्पना राबविण्यात यावी. अशा औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन आयुर्वेद उत्पादनांसाठी कच्चा माल म्हणून उपलब्ध करून देण्यात यावा. या औषधी वनस्पतींच्या विक्रीची हमी शेतकऱ्यांना देण्यात यावी.
सध्या पाणी नमुने घेतले जात आहेत. याकडे बारकाईने लक्ष ठेवून पाणी नमुण्यांचे अहवाल तपासण्यात यावेत. पावसाळ्यात साथीचे रोग फैलावत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे साथरोग उद्भवण्याच्या आधीच प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात याव्यात. या विभागाचे काम करताना नाविण्यपूर्ण संकल्पनांचा अवलंब केला पाहिजे. आयुष विभागाच्या माध्यमातून असंसर्गजन्य आजारांवर विविध उपचार पद्धतींचे संशोधन झाले पाहिजे. यासाठी आयुष विभागाने दूरगामी सकारात्मक परिणाम होतील, अशा कामांचा समावेश असलेला चांगला आराखडा बनवून द्यावा. राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी आवश्यक असलेल्या बाबी, अडचणी व उणीवांचा समावेश असावा.
आरोग्य मंत्री डॉ. सावंत यावेळी म्हणाले, राष्ट्रीय आरोग्य अभियान व आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी केंद्र शासन ‘पीआयपी’ (कार्यक्रम अंमलबजावणी आराखडा) अंतर्गत वर्षाला निधी देत असते. या निधीमधून राज्यात आरोग्य यंत्रणेतील विविध पायाभूत सुविधांची कामे केली जातात. यामुळे निश्चितच आरोग्य यंत्रणा बळकट होते. तरी केंद्र शासनाकडून पीआयपीमध्ये वाढीव निधी देण्यात यावा. आरोग्य विभागातंर्गत काम करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी, नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी केंद्रांचे सहकार्य अपेक्षित आहे. यासाठी दिल्ली येथे राज्यातील आरोग्य यंत्रणेसोबत बैठक घेण्याची मागणीही त्यांनी केली.
No comments:
Post a Comment