मुंबई - राज्याच्या मुख्य सचिवपदाची सूत्रे सुजाता सौनिक यांनी मावळते मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांच्याकडून स्वीकारली. राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मानही सौनिक यांना मिळाला आहे. (First woman Chief Secretary)
मावळते मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमास अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव अनूप कुमार, अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, पर्यटन विभाग प्रधान सचिव जयश्री भोज, प्रधान सचिव आभा शुक्ला, प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, प्रधान सचिव मनीषा वर्मा यांच्यासह इतर विभागाचे प्रधान सचिव, सचिव आणि वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक म्हणाल्या, राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यामध्ये शेतकरी, महिला, बालके, युवक तसेच सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहे. या योजना आणि धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी मी प्रयत्न करेन. शासनाने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपविली आहे. राज्याच्या मुख्य सचिवपदाची धुरा सांभाळतांना सर्व लोकप्रतिनिधी तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच प्रशासकीय यंत्रणेच्या सहकार्याने मी जनतेसाठी प्रामाणिपणे आणि शाश्वत काम करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असेन, अशा शब्दात नव नियुक्त मुख्य सचिव सौनिक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.
मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचा अल्प परिचय -
सुजाता सौनिक या 1987 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. सध्या त्या महाराष्ट्र शासनाच्या गृह विभाग आणि सामान्य प्रशासन विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या. त्या हार्वर्ड विद्यापीठाच्या टी.एच चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ 2018 मधील टेकमी फेलो आहेत. त्यांनी 2019 मध्ये सार्वजनिक आरोग्य, हवामान बदल आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या क्रोस विभागातील समस्या याविषयावर मित्तल साउथ एशिया इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन करत फेलोशिप देखील पूर्ण केली आहे. टेकमी फेलो म्हणून, महाराष्ट्राच्या विमा-आधारित आरोग्य सेवा या विषयावर अभ्यास करतांना केलेल्या संशोधनातून त्यांचा शोधनिबंध देखील प्रसिद्ध झाला आहे. अलीकडेच त्याचे सार्वजनिक आरोग्याचा दृष्टीकोन असलेले ‘कुंभ नाशिक-त्र्यंबकेश्वर’ या पुस्तकाचे प्रकाशन देखील झाले आहे.
त्यांनी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग (SDEED) चे अतिरिक्त मुख्य सचिव (ACS) आणि राज्यस्तरावर सार्वजनिक आरोग्य आणि आर्थिक सुधारणांचे प्रधान सचिव म्हणून काम केले आहे. ऑक्सफर्ड पॉलिसी मॅनेजमेंटच्या अभ्यासातही त्यांचा सहभाग होता. ज्यामध्ये महिला व बाल विकास आणि शालेय शिक्षण या प्रमुख विभागांच्या कामकाजाचा सारांश त्यात मांडण्यात आला होता. त्या मुंबई विद्यापीठ आणि SNDTWU, मुंबईच्या सल्लागार समितीवरही कार्यरत आहेत. तसेच सांघिक स्तरावर त्यांनी महिला व बाल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांमध्ये कंबोडिया व कोसोवोमध्ये UN च्या दोन मानवतावादी मोहिमांमध्ये काम केले आहे. राज्य शासनात विविध पदांची जबाबदारी सांभाळत असतांना त्यांनी शाश्वत आणि पारदर्शक कामकाजावर नेहमीच भर दिला आहे.
No comments:
Post a Comment