कोणत्याही पदावर कुटुंबीय किंवा नातेवाईकांची नियुक्ती करू नका - नरेंद्र मोदी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 June 2024

कोणत्याही पदावर कुटुंबीय किंवा नातेवाईकांची नियुक्ती करू नका - नरेंद्र मोदी



नवी दिल्ली - कोणत्याही पदावर कुटुंबीय किंवा नातेवाईकांची नियुक्ती करू नका, १०० दिवसांच्या अजेंड्यावर काम करण्यास तयार राहा, अशा स्पष्ट सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नव्या सहकारी मंत्र्यांना दिल्या आहेत. (Do not appoint family members or relatives to any post)

देशात तिसऱ्यांदा भाजपप्रणित एनडीएचे सरकार सत्तेत आले आहे. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे पहिले नेते आहेत. पंतप्रधान पदाची शपथ घेण्यापूर्वी नव्या मंत्र्यांना नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी चहापानासाठी बोलावले होते. यावेळी मोदींनी त्यांना काही आवश्यक सूचना केल्या. तसेच नव्या मंत्र्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना,मंत्रिमंडळात सामील झाल्याबद्दल मोदींनी सर्वांचे अभिनंदन केले. तसेच आपल्याला विकसित भारताचा अजेंडा पुढे चालू ठेवण्याची गरज आहे. कोणत्याही व्यत्ययाशिवाय विकासकामे सुरू ठेवायची आहेत. प्रामाणिकपणावर लक्ष केंद्रित करा. गरीब लोक आणि कामगारांवर विशेष लक्ष द्या. किमान चार दिवस मंत्रालयात काम करा आणि उरलेला वेळ शेतात घालवा. कोणत्याही पदावर कुटुंबीय किंवा नातेवाईकांची नियुक्ती करू नका अशा स्पष्ट सूचना नरेंद्र मोदींनी दिल्या.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ५४३ पैकी सर्वाधिक २४० जागा जिंकल्या आहेत. २४० जागा जिंकल्याने भाजपाला २७२ चा बहुमताचा आकडा पार करता आलेला नाही. मात्र भाजपच्या मित्रपक्षांच्या एनडीए आघाडीने २९४ जागा जिंकल्या आहेत. मित्रपक्षांच्या जोरावर बहुमताचा आकडा पार केल्याने नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या बैठकीत नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. बहुमताचा आकडा पार केल्याने एनडीएकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला होता. त्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एनडीएला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात ७१ मंत्री आहेत. त्यात ३० कॅबिनेट मंत्री, ५ राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि ३६ राज्य मंत्री आहेत. राष्ट्रपती भवनाच्या परिसरात संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी पाकिस्तान सोडून भारताच्या शेजारी असलेल्या ७ देशातील राष्ट्रप्रमुख उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad