Mumbai News - अक्षय कुमारच्या हस्ते बहावा झाडांचे रोपण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 June 2024

Mumbai News - अक्षय कुमारच्या हस्ते बहावा झाडांचे रोपण



मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका, वृक्ष प्राधिकरण आणि मेक अर्थ ग्रीन अगेन (MEGA) फाउंडेशनच्या सहकार्याने खेरवाडी (वांद्रे) येथे पश्चिम द्रुतगती महामार्गालगत अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त (BMC) तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते आज (दिनांक २४ जून २०२४) बहावाच्या रोपांची लागवड करण्यात आली. (Mumbai News)

मुंबई महानगराचे पर्यावरण संतुलन टिकवून ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सतत नवनवीन उपक्रम राबवित असते. या उपक्रम अंतर्गत हे वृक्षारोपण पार पडले. अभिनेता अक्षय कुमार यांनी त्यांचे दिवंगत वडील हरी ओम भाटिया आणि आई अरुणा भाटिया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या झाडांचे रोपण केले. यावेळी उप आयुक्त (परिमंडळ ३) (अतिरिक्त कार्यभार) विश्वास मोटे, सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, मेगा फाउंडेशनच्या डॉ. अनुषा श्रीनिवासन अय्यर आदींसह महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मुंबईकरांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. अभिनेता अक्षय कुमार यांनी खेरवाडी परिसरातील आपल्या निवासस्थानाबाबतच्या आठवणींना उजाळा दिला. सोमवारी प्रतिनिधीक स्वरुपात काही बहावा झाडांचे रोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या मोहिमेत बहावाची ३०० झाडे लावण्यात येणार आहेत. ही वृक्षारोपण मोहीम मुंबईला हरित ठेवण्यासाठी राबविण्यात येत आहे. 

तौक्ते चक्रीवादळानंतर अनेक वृक्षांची पडझड झाली. त्यातून झालेले पर्यावरणाचे नुकसान भरून काढण्यासाठी ‘झाडांचा खड्डा स्वीकारा आणि निसर्गाचे पालक बना’ या मोहिमेत आतापर्यंत ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर, शत्रुघ्न सिन्हा, अभिषेक बच्चन, अनुपम खेर, बप्पी लाहिरी, अजय देवगण आणि त्यांचा मुलगा युग देवगण, सोनू निगम, संग्राम सिंह, रणवीर शौरी आणि त्यांचा मुलगा हारून शौरी, रोहित शेट्टी तसेच ज्येष्ठ अभिनेत्री तथा खासदार हेमा मालिनी, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, आयेशा झुल्का आदींनी सहभाग नोंदविला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad