मुंबई - आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत महापालिका म्हणुन ओळखल्या जाणार्या मुंबई महापालिकेत विविध खात्यातील तब्बल ५२ हजार २२१ पदे रिक्त स्वरूपात असल्याची माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे. तसेच यंदाच्या वर्षी निवृत्त होणार्या कर्मचाऱ्यांची संख्याही मोठी असल्याने उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण पडणार आहे. दरम्यान, पालिकेत सध्या कायमस्वरूपी भरती न करता कंत्राटी पद्धतीचा अवलंब केला जात आहे. हे योग्य नसून रिक्त पदे तत्काळ भरली जावीत, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे- बापेरकर यांनी केली आहे. (BMC Vacancy)
मुंबई महापालिकेचा कारभार चालविण्यासाठी १ लाख ४५ हजार कर्मचाऱ्यांची गरज आहे. मात्र सध्या पालिकेचा कारभार फक्त १ लाख कर्मचाऱ्यांवर चालला आहे. मुंबईची लोकसंख्या दीड कोटी असून पुढील २० वर्षांत ही लोकसंख्या १ कोटी ७५ लाख होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देताना कर्मचार्यांअभावी पालिकेची अवघड परिस्थिती होणार आहे. पालिकेत १२९ विविध खाती असून यातील काही खाती अत्यावश्यक सेवेत मोडतात. पालिकेने नागरी सुविधा पुरविण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या निश्चिती १ लाख ४५ हजार १११ इतकी केली होती.मात्र कालांतराने मुंबईची लोकसंख्या वाढत गेल्याने अतिरिक्त खाती सुरू केली. पण त्याठिकाणी नव्याने भरती केली नाही. तसेच विविध कारणांनी रिक्त कर्मचाऱ्यांची शेड्यूल्ड पदेही गेली अनेक वर्षे भरलेली नाहीत.त्यामुळे हा रिक्त पदांचा आकडा वाढला आहे.
No comments:
Post a Comment