मुंबई - मुंबईत आजही २२ हजार कुटुंब दरडीच्या छायेत जीवन जगत आहेत. भांडुप, विक्रोळी, कांजूर, घाटकोपर, चेंबूर, कुर्ला याठिकाणासह मुंबईत १४९ ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका आहे. याठिकाणी राहणाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी स्थलांतरित व्हावे यासाठी नोटीस बजावण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
यंदा पाऊस समाधानकारक बरसणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी नाल्यातील गाळ उपसा करण्यावर भर दिला आहे. दरवर्षी पावसाळ्यात चेंबूर, भांडुप आदी ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडतात. यंदाही १४९ दरड कोसळण्याचा धोका असून याठिकाणी २२ हजार कुटुंब वास्तव्य करतात. पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना टाळण्यासाठी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे; मात्र अनेक कुटुंब स्थलांतरित होण्यास नकार देत असल्याने वॉर्ड स्तरावर नोटीस बजावण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, या १४९ मधील केवळ सात ठिकाणे पालिकेच्या कार्यक्षेत्रात आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून मुंबईत अतिवृष्टीत दरडी कोसळणारी ठिकाणे, जमीन खचण्याचा धोका असल्याच्या ठिकाणांचे सर्वेक्षण करून आवश्यक उपाययोजना करण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात येतात. २०१७ मध्ये पालिकेच्या कार्यक्षेत्रातील एकूण २९९ ठिकाणांचे शास्त्रीय पद्धतीने सर्वेक्षण करण्यात आले होते. यासाठी भारतीय भौगोलिक सर्वेक्षण विभागाची मदत घेण्यात आली होती. २०१८ मध्ये भारतीय सर्वेक्षण विभागाने २९९ पैकी २४९ संभाव्य दरडी कोसळण्याच्या ठिकाणांचे सखोल सर्वेक्षण करून त्याचे चार उपप्रकारांत विभाजन केले. यामध्ये ४६ ठिकाणे अतिधोकादायक असल्याचे जाहीरही करण्यात आले होते. यानुसार, केलेल्या उपाययोजनांमुळे आता संपूर्ण मुंबईत १४९ धोकादायक ठिकाणे शिल्लक आहेत. यातील फक्त सात ठिकाणे पालिकेच्या कार्यक्षेत्रात असून, या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत
No comments:
Post a Comment