मुंबई - लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघातील निवडणुकीसाठी सोमवार 20 मे 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधीत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात 7 हजार 353 एवढी मतदार केंद्रे असून रविवार 19 मे 2024 रोजी सर्व मतदान पथके मतदान यंत्रासह रवाना होतील. मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदारांनी त्यांना दिलेला मतदानाचा हक्क जरुर बजावावा, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्ग क्षीरसागर यांनी आज येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी क्षीरसागर बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, निवडणूक उपजिल्हाधिकारी तेजस समेळ, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी क्षीरसागर यांनी सांगितले की,लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात 26- मुंबई उत्तर, 27- मुंबई उत्तर पश्चिम. 28- मुंबई उत्तर पूर्व, 29- मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघांचा समावेश आहे. त्यासाठी 26 एप्रिल ते 6 मे 2024 या कालावधीत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडली. एकूण चार लोकसभा मतदारसंघात 87 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. त्यात 26- मुंबई उत्तरमध्ये 19, 27- मुंबई उत्तर पश्चिम 21, 28- मुंबई उत्तर पूर्वमध्ये 20, तर 29- मुंबई उत्तरमध्ये 27 उमेदवार निवडणूक लढवित आहेत.
लोकसभेच्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघांत विधानसभेच्या 26 मतदारसंघांचा समावेश आहे. जिल्ह्यातील मतदारांची संख्या 74 लाख 48 हजार 383 मतदार असून पुरुष मतदारांची संख्या 40 लाख 2 हजार 749, तर महिला मतदारांची संख्या 34 लाख 44 हजार 819 एवढी आहे. याशिवाय तृतीयपंथी मतदारांची संख्या 815 एवढी आहे. दिव्यांग मतदारांची संख्या 16 हजार 116, तर 85 वर्षांवरील मतदारांची संख्या 98 हजार 263 आहे. या चारही मतदारसंघात मतदान केंद्राची ठिकाणे 1 हजार 83 असून मतदान केंद्रांची संख्या 7 हजार 353 एवढी आहे. एकूण मतदान केंद्रांपैकी 50 टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग केले जाणार आहे. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी सावली, पाणी, एअर कुलर/पंखे, व्हीलचेअरसह मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 4 जून 2024 रोजी नेस्को, गोरेगाव व उदयांचल शाळा, गोदरेज संकुल, विक्रोळी येथे मतमोजणी होईल.
लोकसभेच्या चारही मतदारसंघात मतदानासाठी 40 हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण झाले आहे. रविवार 19 मे 2024 रोजी शेवटचे प्रशिक्षण पूर्ण होऊन मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी व कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर आवश्यक साहित्यासह रवाना होतील. निवडणूक कर्तव्यावर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसह अत्यावश्यक सेवेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत 22 हजार 44 मतदारांनी आपल्या टपाली मतदानाचा हक्क बजावला आहे, तर दोन हजार 513 ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांनी घरातूनच आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच सक्षम ॲपवर नोंदणी केलेल्या दिव्यांग मतदारांना घरापासून मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच 54 लाख मतदारांपर्यंत मतदार चिठ्ठी पोहोचविण्यात आली आहे. ही सर्व प्रक्रिया रविवार 19 मे 2024 पर्यंत पूर्ण होईल, असेही जिल्हाधिकारी क्षीरसागर यांनी सांगितले.
मतदान केंद्रांपासून 100 मीटर परिसरात मोबाईल आणण्यास बंदी-
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान केंद्रापासून 100 मीटर परिसरात मोबाईल आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. मतदानाची सर्व प्रक्रिया गोपनीय आहे. मतदान केंद्रावरील गोपनीयतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. मतदारांच्या गोपनीयतेसाठी मतदान केंद्रापासून 100 मीटर परिसरात मोबाईल आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. मतदारांनीही मतदानासाठी येताना मोबाईल आणू नयेत, असेही आवाहन जिल्हाधिकारी क्षीरसागर यांनी केले आहे.
मतदान हा भारतीय संविधानाने दिलेला मौलिक हक्क आहे. प्रत्येक नागरिकाने मतदान करून या मौलिक अधिकाराचा वापर करीत भारतीय लोकशाही बळकटीकरणाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे.
- राजेंद्र क्षीरसागर,
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी
मुंबई उपनगर जिल्हा
No comments:
Post a Comment