मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेचे बहुतांश अधिकारी- कर्मचारी नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या कर्तव्यावर होते. त्यामुळे मुंबईत दरवर्षी मान्सूनपूर्व करण्यात येत असलेल्या नालेसफाईची कामे योग्य पद्धतीने झालेली नाहीत. परिणामी, मुंबई शहरात या पावसाळ्यात पाणी तुंबण्याची मोठी भीती आहे. म्हणून नालेसफाईच्या कामांचा आढावा घेवून बोगस कामे केलेल्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी बुधवारी केली आहे. (Mumbai will flood this year) (Mumbai News)
आमदार रईस शेख यांनी बृहन्मुबई महापालिका आयुक्तांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. पत्रात आमदार शेख म्हणतात की, यंदा पावसाचे प्रमाण अधिक असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने पाणी तुंबण्याबाबबत अधिक खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. मात्र प्रशासन निवडणूक कामात व्यस्त राहिल्याने कंत्राटदारांचे फावले आहे. दक्षिण मुंबईमध्ये नालेसफाईच्या कामांमध्ये मोठी अनियमितता झाली असून गाळ उपसण्याच्या कामात ढिसाळपणा झाला आहे, असा आरोप केला.
शहरातील पंपिंग स्टेशनच्या कामांची सद्यस्थिती आणि यंदा करण्यात आलेली नालेसफाई यासंदर्भात पालिका प्रशासनाने पुन्हा आढावा घ्यावा आणि आढाव्यातील माहिती मुंबईकर नागरिकांसाठी सार्वजनिक करावी. त्यामुळे मुंबईकर नागरिक पालिकेने केलेल्या नालेसफाईच्या कामासंदर्भात आश्वस्त होतील, अशी मागणी आमदार रईस शेख यांनी आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.
No comments:
Post a Comment