पुणे - भाजप आरक्षण देण्यासंदर्भात आश्वासन देत आहे. परंतु प्रत्यक्षात लाभ मिळत नाही. त्यामुळे वंचित घटकांना आरक्षण देण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक वाढविणार का, यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान देतानाच कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी काँग्रेस सत्तेत आल्यावर आरक्षणाची मर्यादा आम्ही संपवून टाकू, ही मर्यादा कृत्रिम आहे, असे म्हटले.
पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची आज सभा झाली. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून प्रहार केला. ते म्हणाले की, ही संविधान वाचण्यासाठीची लढाई आहे. लोकांना जे अधिकार संविधानामुळे मिळाले. संविधान बदलले तर देशातील २० ते २५ लोकांच्या हातात अधिकार जातील. मोदींनी २२ उद्योगपतींचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ केल्याचे राहुल गांधी म्हणाले. एवढ्या पैशातून देशातील शेतक-यांचे कर्ज २४ वर्षांसाठी माफ करता आले असते. मनरेगा २४ वर्षे या पैशातून चालवता आली असती, असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक वाढवतो, म्हणून जाहीर करावे. काँग्रेस सत्तेत आल्यावर आरक्षणाची मर्यादा आम्ही संपवून टाकू, ही मर्यादा कृत्रिम आहे. देशातील दलित, आदिवासी आणि मागासवर्गीय लोकांची एकत्रित संख्या ७३ टक्के आहे. मात्र, ते मागास आहेत. देशातील मीडिया या ७३ टक्क्यांचे प्रश्न मांडत नाहीत. हाय कोर्टाच्या ६५० न्यायाधिशांमध्ये १०० लोकही ७३ टक्के असलेल्या मागासवर्गीयांपैकी नाहीत. बजेटमधील पैसे खर्च करण्यावर मोजक्या लोकांचा अधिकार आहे. मात्र, मीडिया हे न दाखवता अंबानीच्या घरातील लग्न दाखवतात, अशी टीका त्यांनी केली.
निवडणूक रोख्यांमध्ये हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. सर्वोच्च न्यायालय म्हणते की, निवडणूक रोखे योजना बेकायदेशीर आहे, ती थांबवा आणि काय होते ते आम्हाला कळवा. आम्ही तारीख मागूनही आम्हाला दिली नाही. मोदीजी म्हणत होते राजकारण स्वच्छ करत आहे, तर तुम्ही देणगीदारांची नावे का लपवली, देणगीदारांची नावे बाहेर आल्यानंतर एक दिवस कळले की एका कंपनीला हजारो कोटींचे कंत्राट मिळते, त्यानंतर लगेचच ती कंपनी भाजपला पैसे देते, असे राहुल गांधी म्हणाले.
महाराष्ट्राच्या रक्तात काँग्रेस
मी जेव्हा महाराष्ट्रात येतो, तेव्हा मला आनंद होतो. महाराष्ट्र हे काँग्रेसचे राज्य आहे. मी काँग्रेस संघटनेबद्दल बोलत नाही, विचारधारेबद्दल बोलत आहे. तुमच्या रक्तात काँग्रेसची विचारधारा आहे. अर्थात राज्यातील जनतेच्या रक्तात काँग्रेस असल्याचे राहुल गांधई म्हणाले.
समुद्राखाली जाऊन मोदी यांचा ड्रामा
नरेंद्र मोदी कधी पाकिस्तानची गोष्ट सांगतील, कधी समुद्राच्या खाली जाऊन ड्रामा करतील. यांनी राजकारणाची गंमत लावली आहे, असे म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार प्रहार केला.
No comments:
Post a Comment