मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईतील लहान मोठे नाले, नद्यांमधील गाळ काढण्याच्या कामांना वेग देण्यात आला आहे. ही सर्व कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी वेळेत आणि योग्यप्रकारे पूर्ण करावीत, जिथे गाळ उत्सव कामे पूर्ण झाली असतील तेथील मनुष्यबळ आणि संयंत्रे आवश्यक त्या ठिकाणी न्यावीत, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा करताना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. (Mumbai latest News)
पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून, मुंबई महानगरातील नद्या आणि नाल्यांमधील गाळ काढण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली या कामांना अधिक वेग देण्यात आला आहे. या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून योग्य ते निर्देश देण्याच्या दृष्टीने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांनी शहर विभागात, तर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात सुरू असलेल्या कामांची आज (दिनांक २५ मे २०२४) पाहणी केली.
डॉ. जोशी यांनी एफ दक्षिण विभागातील प्रतीक्षा नगर बस डेपो कंपाऊंड नाला, जे. के. केमिकल नाला, शास्त्रीनगर नाला, डब्ल्यूटीटी नाला या ठिकाणी गाळ काढण्याच्या कामांची पाहणी केली. त्यानंतर जी उत्तर विभागात शीव रुग्णालय परिसरातील रावळी नाला, दादर धारावी नाला, राजीव गांधी नगर नाला, राजीव गांधी नगर, लूप रोड आणि लाल बहादूर शास्त्री मार्ग येथे देखील प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
त्याचप्रमाणे विविध ठिकाणी मलनिःसारण, पर्जन्य जल आदी वाहिन्यांवर मनुष्य प्रवेशिकांच्या (मॅनहोल) जागी लावलेल्या प्रतिबंधक जाळी तसेच झाकणांची देखील पाहणी केली. आवश्यक त्या सर्व ठिकाणी मनुष्य प्रवेशिकांवर जाळी आणि झाकणे लावण्याची कार्यवाही वेगाने करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. उप आयुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे, सहायक आयुक्त (एफ उत्तर) चक्रपाणी अल्ले आदींसह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पूर्व आणि पश्चिम उपनगरातील नद्या आणि नाल्यांमधील गाळ काढण्याच्या कामांसह रस्ते कामांनाही वेग-
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील नाल्यातून गाळ काढण्याच्या तसेच रस्ते कामांचा प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला. यावेळी उप आयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) श्रीधर चौधरी, प्रमुख अभियंता (पूल) विवेक कल्याणकर, प्रमुख अभियंता (रस्ते) मनीष पटेल यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बांगर यांनी पूर्व उपनगरातील पीएमजीपी नाला, देवनार नाला, मिठी नदीचा बक्षीसिंग कंपाऊंड येथील परिसर, पश्चिम उपनगरातील एसएनडीटी नाला लिडो टॉवर, मीलन भूयारी मार्ग तसेच अंधेरी भूयारी मार्ग येथे जाऊन गाळ काढण्याच्या कामांची पाहणी केली. नाल्यातून गाळ काढण्याचे काम वेगाने करून कुठेही पाणी साचणार नाही, याची दक्षता घेऊन उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही बांगर यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिले.
गाळ उपसा केलेल्या नदी, नाल्यांमध्ये कचरा आणि टाकाऊ वस्तू कृपया टाकू नयेत -
गाळ उपसा केलेल्या आणि तरंगता कचरा काढलेल्या नदी नाल्यांच्या ठिकाणी आजूबाजूच्या वसाहतींमधून कचरा तसेच टाकाऊ वस्तू टाकून देण्याचे प्रकार वारंवार घडतात. त्यातून प्रशासनाला वारंवार त्याच ठिकाणी तरंगता कचरा काढण्यासाठी यंत्रणा खर्च करावी लागते. तसेच स्वच्छता केल्यानंतरही नागरिकांनी नाल्यांमध्ये कचरा टाकून दिल्याने अकारण महानगरपालिका प्रशासनावर त्याचे खापर फोडले जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशा प्रकारचा कचरा आणि मोठ्या आकाराच्या / अवजड वस्तू नदी नाल्यांमध्ये अडकून जोरदार पावसाप्रसंगी पाणी तुंबण्याची शक्यता वाढते. सबब, अशा घटना टाळण्यासाठी मुंबईकर नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे आणि गाळ उपसा केलेल्या नदी नाल्यांमध्ये कृपया कचरा तसेच वस्तू टाकू नयेत, असे नम्र आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने अश्विनी जोशी तसेच अभिजीत बांगर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment