मुंबई - भारत निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आचारसंहितेच्या नियमांचे उमेदवारांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक स्तुती चारण यांनी केले आहे.
२८ - मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या अंतिम वेळेनंतर या मतदासंघात २० उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. या उमेदवारांना भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना देण्यासाठी विक्रोळी येथील २८ -मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक स्तुती चारण बोलत होत्या. खर्च निरीक्षक सुनील यादव, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील, लेखा समन्वय अधिकारी सीताराम काळे आणि २० उमेदवार उपस्थित होते.
चारण म्हणाल्या की, भयमुक्त वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी उमेदवारांनी सहकार्य करावे. निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनांनुसार आचारसंहितेच्या तसेच माध्यम प्रमाणन आणि सनियंत्रण समितीच्या नियमांचे पालन करावे. नियमानुसार निवडणूक प्रतिनिधी, मतमोजणी प्रतिनिधी, मतदान प्रतिनिधी यांची नेमणूक करावी. मतदानाच्या दिवशी होणाऱ्या मतदान प्रक्रियेबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली. तसेच, मतदानापर्यंत पालन करावयाच्या नियमांची माहिती श्रीमती चारण यांनी यावेळी दिली.
तीन वेळेस होणार उमेदवारांच्या खर्चाची तपासणी -
लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 करीता 28- मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातील उमेदवारांनी प्रचारादरम्यान करावयाच्या खर्चाबाबतचे नियम आणि मर्यादेबाबत केंद्रीय खर्च निरीक्षक डॉ. सुनील यादव यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केले. प्रचार कालावधीत तीन वेळेस उमेदवारांच्या खर्चाच्या नोंद वहीची तपासणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
उमेदवारांना ९५ लाखांपर्यंत खर्चाची मर्यादा आहे. त्यांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करून, निर्भय आणि नि:पक्ष वातावरणात निवडणूक लढवण्याच्या सूचना करत ते म्हणाले की, ९ मे, १४ मे व १८ मे २०२४ या दिवशी २८ – मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघाचे कार्यालय, पिरोजशहा नगर सांस्कृतिक सभागृह, विक्रोळी येथे उमेदवारांच्या खर्च हिशोबाची तपासणी करण्यात येणार आहे.
तपासणीसाठी उमेदवारांनी परिशिष्ट E-1, भाग ‘अ’, ‘ब’, ‘क’, खर्चाची मूळ प्रमाणक (Invoce, GST क्रमांक आदींसह परिपूर्ण), तपासणी दिनांकापूर्वी अद्ययावत बँक पासबुक/Bank Statement, सर्व परवाने (वाहन, रॅली आदी). वरील नमूद केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे खर्च लेखाच्या तपासणीसाठी उमेदवार/उमेदवाराचे प्रतिनिधी यांनी विहीत वेळेत अभिलेख्यांसह निवडणूक खर्च निरीक्षक यांच्याकडे उपस्थित न राहिल्यास संबंधित उमेदवारांविरुद्ध लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 प्रमाणे आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असेही खर्च निरीक्षक डॉ. सुनील यादव यांनी आहे.
No comments:
Post a Comment