मुंबई - रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वेवर ३१ मे ते २ जूनपर्यंत जम्बो ब्लॉक घेतला असून जवळपास ९३० लोकल फेऱ्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे याचा फटका मुंबईसह, ठाणे व कल्याण-डोंबिवली येथील प्रवाशांना बसणार आहे. दरदिवशी लाखोंच्या संख्येने नागरिक कामानिमित्त लोकलने प्रवास करतात. त्यामुळे शासकीय, निमशासकीय कार्यालये व खासगी कंपन्यातील नोकरदार वर्गाला ‘सुट्टी’ किंवा ‘वर्क फ्रॉम होम’ जाहीर करावा, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना प्रवक्त्या ॲड. सुशीबेन शाह यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे.
मध्य रेल्वेचा मुंबई विभाग खूप संवेदनशील असून, येथे कोणतीही घटना घडल्यास, त्याचे पडसाद सर्वदूर पडतात. शुक्रवारी रात्रीपासून सीएसएमटी येथे ब्लॉक आहे. त्यामुळे ९३० लोकल फेऱ्या रद्द झाल्या आहेत. परिणामी, लाखो प्रवाशांचे हाल होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने याची माहिती अगोदर देणे गरजेची होती. परंतु, जनसंपर्क विभागाच्या सावळा गोंधळामुळे नागरिकांना प्रवासादरम्यान नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. तसेच, मोठ्या प्रमाणात प्रवासी घराबाहेर पडले तर गर्दीचे नियोजन रेल्वे प्रशासनाने कसे करणार? प्रवासादरम्यान चेंगराचेंगरी झाल्यास ह्याची जबाबदारी कोण घेणार? असे अनेक प्रश्न शिवसेना प्रवक्त्या ॲड. सुशीबेन शाह यांनी उपस्थित केले आहे.
तसेच या ब्लॉकमुळे शेकडो रेल्वेगाड्या रद्द आणि शॉर्ट टर्मिनेट झाल्या आहेत. सीएसएमटीपर्यंत येणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या दादर, ठाणे, पनवेल, नाशिक व पुण्यापर्यंत चालवण्यात येतील. याशिवाय, सीएसएमटीवरून सुटणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या दादर, पनवेल, नाशिक स्थानकातून सुटतील. नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, ठाणे या भागातील अनेक प्रवाशी नोकरीनिमित्त प्रवास करतात. परंतु, मध्य रेल्वेच्या जम्बो ब्लॉकमुळे प्रवासी लोकलमधून प्रवास कसा करणार हा प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे, नोकरदार वर्गाला सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होम जाहीर करावा, अशी मागणी ॲड. सुशीबेन शाह यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
No comments:
Post a Comment