मुंबई - नामसाधर्म्य असलेला उमेदवार उभा करुन विरोधी पक्षाच्या उमेदवाराला अडचणीत आणण्याची खेळी खेळली जाते. याला 'रायगड पॅटर्न' म्हणून ओळखले जाते. हाच रायगड पॅटर्न आता मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे. ईशान्य मुंबई मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या नावाचे आणखी चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे संजय पाटील यांना फटका बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. (Mumbai News)(Political News)(Election News)
ईशान्य मुंबईतून एकूण ३४ उमेदवारांनी ४२ अर्ज केले आहेत. या अर्जांमध्ये मविआचे उमेदवार संजय पाटील यांच्या नावासारखे आणखी चार अर्ज आल्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांनीच हे अर्ज भरुन घेतल्याचा आरोप संजय पाटील यांनी केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी ईशान्य मतदासंघात ४२ अर्ज आले. एकूण ३४ उमेदवार रिंगणात असून कोटेचा आणि पाटील यांनी प्रत्येकी तीन अर्ज भरले आहेत. संजय पाटील या नावाचे चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामुळे नावावरून मतदार संभ्रमित होऊन संजय पाटील यांचे मत विभागले जाणार आहे. याचा फटका संजय पाटील यांना बसू शकतो. अशी शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.
मतदार आमच्या पाठीशी -
संजय पाटील यांच्या नामसाधर्म्य आणखी चार अर्ज दाखल झाले आहेत. त्याबद्दल आश्चर्य व्यक्त होतंय. मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठीच कोटेचा यांनी स्वत: निवडणूक कार्यालयात थांबून डमी उमेदवार उभे केले आहेत. आम्हाला मिळत असलेलं नागरिकांचं प्रेम आणि पाठिंबा पाहून प्रतिस्पर्धी उमेदवार अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळेच डमी उमेदवार उभे केले जात आहेत. पण मतदारराजा हुशार आहे. तो आमच्या पाठिशी निश्चित उभा राहील.
- संजय दिना पाटील (शिवसेना ठाकरे गट उमेदवार)
मी लढायला तयार -
मी प्रचारात व्यग्र आहे. मला अशा अर्जांबद्दल कल्पना नाही. असे कितीही संजय पाटील उभे राहिले तरी मी त्यांच्यासमोर लढायला तयार आहे.
- मिहीर कोटेचा (भाजप उमेदवार)
काय आहे रायगड पॅटर्न -
२०१४ मध्ये रायगड मतदारसंघात शिवसेनेचे अनंत गीते विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल तटकरे असा सामना झाला. याच निवडणुकीत सुनिल तटकरे नावाचा एक अपक्ष उमेदवार होता. त्याला ९ हजार ८४९ मतं मिळाली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तटकरेंचा २ हजार ११० मतांनी पराभव झाला होता.
No comments:
Post a Comment