अमरावती - अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीविरोधात भूमिका घेणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी महायुतीवर आणखी एक प्रहार केला आहे. अमरावतीमध्ये भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्याविरोधात प्रहार पक्षाकडून दिनेश बुब यांना उमेदवारी दिली आहे. बच्चू कडू त्यासाठी जोमाने प्रचाराला लागले आहेत. भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्यावर रोज तीव्र शाब्दिक हल्ले ते करत आहेत. आता आणखी एक प्रहार बच्चू कडू यांनी केला आहे. रामटेकमध्ये काँग्रेसचे उमेदवार श्याम कुमार बर्वे यांना बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे महायुतीमध्ये सर्व अलबेल नसल्याचा संदेश पुन्हा गेला आहे.
नवनीत राणा यांना अमरावतीमध्ये उमेदवारी दिल्यावरून बच्चू कडू नाराज आहेत. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना मांडली होती. प्रसंगी महायुतीतून बाहेर पडू पण नवनीत राणांसाठी मत मागणार नाही, असे बच्चू कडू यांनी म्हटले होते. अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी दिल्यावरून नाराज असलेल्या बच्चू कडूंनी आता रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला समर्थन जाहीर केले. म्हणजे बच्चू कडू भाजपशी जुळवून घेणार नाहीत, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत.
महायुतीत सन्मान नाही -
बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे दोन आमदार आहेत. त्यांनी लोकसभेसाठी एक जागा मागितली होती. तसेच अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यास विरोध केला होता. त्यानंतरही भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली. यामुळे प्रहार पक्षाचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. नागपूरमध्येही प्रहार जिल्हा कार्यकारिणीची बैठक २ एप्रिल रोजी रामटेक येथे घेतली. त्यात महायुतीमध्ये बच्चू कडू यांचा सन्मान होत नाही. तसेच राणा दाम्पत्याकडून त्यांच्यावर खोटे आरोप होत आहेत. त्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.
रामटेकमधील बैठकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा प्रहारच्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला. त्याची माहिती ३ एप्रिल रोजी बच्चू कडू यांना देण्यात आली. त्यानंतर बच्चू कडू यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर ४ एप्रिल रोजी महाविकास आघाडीचे रामटेकमधील उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला.
No comments:
Post a Comment