राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘प्रसारभारती’ आता ‘प्रचारभारती’झाली आहे. निवडणुकीच्या धामधुमीत भाजप आपला डाव साधू इच्छितोय. प्रत्येक गोष्टीचे भगवेकरण करून त्याचा दर्जा सुधारणार नाही, हे यांना कधी समजणार कोण जाणे. हा नवा अवतार आणि बातम्यांचा नवा प्रवास लोकशाहीच्या मुळावर उठला आहे. नवा अवतार सादर करतानाची जाहिरात करतानासुद्धा त्याची स्क्रिप्ट भाजप कार्यालयाने दिल्यासारखी वाटते.
तसेच, डीडीच्या लोगोमधील पृथ्वीचे रंगीबेरंगी सुंदर रूपदेखील यांनी भगवे करून टाकले आहे. जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आणि जगाने आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन ही मंडळी संकुचित करायला निघाली आहेत. याला वेळीच आळा घालायला पाहिजे, असेही आव्हाडांनी म्हटले आहे. काँग्रेसने आरोप केला आहे की, दूरदर्शनच्या लोगोचा रंग बदलणे म्हणजे सरकारी संस्थांवर कब्जा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. हे पाऊल नक्कीच भारताच्या पब्लिक ब्रॉडकास्टरच्या तटस्थतेला आणि विश्वासार्हतेस कमकुवत करत आहे.
याशिवाय मोदी सरकारने निवडणुकीच्या तोंडावर असे करून आचारसंहितेचा भंग केला आहे, अशी तक्रार तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली असून, कारवाईचीही मागणी केली आहे. आता प्रसार भारती ही प्रचार भारती झाली, असे तृणमूलचे खासदार आणि संस्थेचे माजी सीईओ जवाहर सरकार यांनी म्हटले आहे.
No comments:
Post a Comment