मुंबई - लोकसभा निवडणूकीसाठी मतदारनोंदणी करुन सक्षम लोकशाहीमध्ये सहभागी व्हावे. मतदारयादीमध्ये नाव नोंदविण्याची संधी अजूनही आहे, मतदारांनी मतदारयादीत आपले नाव तपासून घ्यावे आणि आपले नाव नसेल तर मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळावर किंवा Voter Helpline Mobile App वर तसेच मतदार मदत क्रमांक १९५० यावर संपर्क करावा. तसेच याबाबत काही अडचणी येत असतील, तर मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे मतदारांसाठी मतदार हेल्पलाइन क्रमांक ०२२२०८२२६९३ सुरू करण्यात आला आहे. मतदारांनी या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव केले आहे.
भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-२०२४ ची घोषणा केली असून आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी यादव यांनी केले आहे. मुंबई शहर जिल्ह्यात `३०-मुंबई दक्षिण मध्य`, `३१-मुंबई दक्षिण` हे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. मुंबई शहर जिल्ह्यात २४ लाख ५९ हजार ४४३ मतदार असून जिल्ह्यात दिनांक २० मे २०२४ (सोमवार) रोजी मतदान होणार आहे. तर दिनांक ४ जून २०२४ (मंगळवार) रोजी मतमोजणी होणार आहे. तरी, मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क येत्या २० मे २०२४ रोजी आवर्जून बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे.
लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे
* निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्दीची तारीख २६ एप्रिल २०२४
* नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची अंतिम तारीख ३ मे २०२४
* नामनिर्देशन पत्राची छाननी तारीख ०४ मे २०२४
* उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ०६ मे २०२४
* मतदानाची तारीख २० मे २०२४
* मतमोजणीची तारीख ०४ जून २०२४
* निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख ६ जून २०२४
साडेबारा हजार कर्मचारी सज्ज
लोकसभा निवडणूक-२०२४ साठी मुंबई शहर जिल्ह्याअंतर्गत असलेल्या ‘३०-मुंबई दक्षिण मध्य’, ‘३१-मुंबई दक्षिण’ लोकसभा मतदारसंघासाठी साडेबारा हजार अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले आहेत. निवडणुका पारदर्शक नि:पक्षपाती व भयमुक्त वातावरणात होण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती यावेळी संजय यादव यांनी दिली. मुंबई शहर जिल्ह्यातील मतदारांसाठी असलेल्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यानुसार उपाययोजना याबाबत सर्व संबंधितांनी खबरदारी घ्यावी, असेही यादव यांनी सांगितले.
मुंबई शहर जिल्ह्यातील निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांची माहिती
एकूण मतदार :- २४ लाख ५९ हजार ४४३
एकूण पुरुषः- १३ लाख २८ हजार ५२०
एकूण स्त्री:- ११ लाख ३० हजार ७०१
एकूण तृतीयपंथीः- २२२
ज्येष्ठ नागरिक मतदार (८५+)
एकूण:- ५५ हजार ७५३
एकूण पुरूष :-२६ हजार ७९०
एकूण स्त्री :- २८ हजार ९६२
१८ ते १९ या वयोगटातील मतदार
एकूण मतदारः- १७ हजार ७२६
एकूण पुरुषः ९ हजार ८७६
एकूण स्त्री:- ७ हजार ८५०
नवमतदारांची एकूण नोंदणी ६७२४ (दि.६ जानेवारी ते २ एप्रिल २०२४)
दिव्यांग मतदार
एकूण मतदार :- ५८१०
एकूण पुरुष:- ३४८५
एकूण स्त्रीः- २३२५
मतदान केंद्रांची माहिती
एकूण मतदान केंद्रः- २ हजार ५०९
एकूण सहाय्यकारी मतदान केंद्र:- ०८
एकूण सखी महिला मतदान केंद्रः- ११
नवयुवकांसाठी मतदान केंद्रः- ११
दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्र :- ०८
संवेदनशील मतदान केंद्रे:- ८९
निवडणूक कामासाठी मुंबई जिल्हा प्रशासकीय यंत्रणा सज्ज -
`३०-मुंबई मध्य दक्षिण` लोकसभा मतदारसंघासाठीकोकण विभागाचे अपर आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे यांच्यासह उपजिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी पाटील, जयकृष्ण फड, वैशाली चव्हाण, प्रशांत पानवेकर तर तहसीलदार तथा अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दीपाली गवळी, प्रियंका ढोले, अमोल कदम आणि नायब तहसीलदार संजय मिरगांवकर, अनिल अहिरे, एस.एस.पांडे, सी.बी. चांदोरकर यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
`३१-मुंबई दक्षिण` लोकसभा मतदारसंघासाठी अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रवी कटकधोंड यांच्यासह उपजिल्हाधिकारी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित देशमुख, गणेश सांगळे, कृष्णा जाधव, बाळासाहेब वाकचौरे, अभिजित भांडे-पाटील आणि विजयकुमार सूर्यवंशी तसेच तहसीलदार तथा अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा कामथे, प्रतिभा वराळे, पल्लवी तभाने आणि आदेश डफळ, सचिन खाडे, सारिका कदम यांची तर नायब तहसीलदार डी.टी. केळुसकर, दीपाली कुलकर्णी, बी.एस. गायकवाड, रामकिसन चव्हाण, अनिल कुळे आणि सुनील कदम यांचा समावेश आहे. निवडणूक आचारसंहितेचे पालन व्हावे, यासाठी फ्लाईंग सर्व्हेलन्स टीम (FST) ९४, स्टॅटस्टीक सर्व्हेलन्स टीम (SST)-९९, व्हिडीओ व्हिवींग टीम (VVT)- १४, व्हिडीओ सर्व्हेलन्स टीम (VST)-२४ टीम नियुक्त करण्यात आल्या आहेत.
National Grievance Service Portal ( NGSP ) पोर्टल
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापना करण्यात आला आहे. https://ngsp.eci.gov.in/ या पोर्टलवर मुंबई शहर जिल्ह्यातील दि. १६ मार्च ते दि. ३१ मार्च २०२४ या कालावधीत मतदार नोंदणीशी संबंधित एकूण ४६१ तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी १५३ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. उर्वरित ३०८ तक्रारी या मतदान नोंदणीशी संबंधित नसल्यामुळे त्या निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली.
यादव म्हणाले की, ``भारत निवडणूक आयोग यांनी National Grievance Service Portal (NGSP) हे नागरिकांकडून मतदार नोंदणीशी संबंधित प्राप्त तक्रारींवर देखरेख व त्यांचे निराकरण करण्याकरिता कायमस्वरूपी एक खिडकी योजनेप्रमाणे तयार केलेले पोर्टल आहे. या पोर्टलवर नागरिक मतदार नोंदणीशी संबंधित तक्रार केव्हाही करू शकतात.``
c-Vigil मोबाईल ॲप
आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यासाठी निवडणूक आयोगाने cVigil हे मोबाईल ॲप विकसित केले आहे. या ॲपमध्ये दक्ष नागरिकाला एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या प्रसंगाचे सदर ॲपमध्ये छायाचित्र अथवा व्हिडिओ काढून तक्रार नोंदविता येणार आहे व त्यावर जिल्हा प्रशासन तसेच मुख्य निवडणूक कार्यालयाकडून तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे. cVigil या मोबाईल ॲपवर दि. १६ मार्च ते दि. २ एप्रिल २०२४ या कालावधीत मुंबई शहर जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक आदर्श आचारसंहिता उल्लंघनासंदर्भात एकूण ४० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या सर्व ४० तक्रारींचे निराकरण तातडीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment