भाजपाच्या दबावामुळे भावना गवळी, हेमंत पाटील यांचा पत्ता कट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 April 2024

भाजपाच्या दबावामुळे भावना गवळी, हेमंत पाटील यांचा पत्ता कट


मुंबई - भाजपाच्या दबावापुढे अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना झुकावे लागले आहे. हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांची आधी जाहीर केलेली उमेदवारी रद्द करून त्यांच्या जागी बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यवतमाळ वाशिमच्या विद्यमान खासदार भावना गवळी (Bhavna Gawli) यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली असून, त्यांच्या जागी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिममधून उमेदवारी देण्यात आली आहे. नाशिकच्या जागेसाठी भाजप आग्रही असल्याने तेथील शिंदेंच्या शिवसेनेचे (Shivsena) विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचीही उमेदवारी जाणार अशी चिन्हे आहेत तर हातकणंगलेमधील शिंदेचे खासदार धैर्यशील माने यांनाही बदलले जाणार अशी चर्चा आहे.

गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील जागावाटपाचा गोंधळ सुरू होता. दुस-या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत आली तरी कोंडी फुटत नव्हती. उद्धव ठाकरे यांना सोडून आपल्या सोबत आलेल्या सर्व खासदारांना उमेदवारी मिळालीच पाहिजे अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली होती. परंतु भाजपाने काही जागांसाठी व काही उमेदवार बदलण्यासाठी आग्रह धरला होता. अखेर या दबावापुढे शिंदे यांना नमावे लागले आहे. शिंदे गटाने पहिल्या यादीत हिंगोलीतून हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती. पण आज अखेरच्या क्षणी त्यांच्याऐवजी बाबुराव कदम कोहळीकर यांचे नाव जाहीर करण्यात आले. हेमंत पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिममधून उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे तेथील खासदार भावना गवळी यांचे तिकीट कापले जाणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. नाशिकच्या हेमंत गोडसे आणि हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांचेही पत्ते कापले जाणार अशी चर्चा असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपाने मोठा धक्का दिला आहे. भाजपच्या दबावामुळे आपल्या सोबत आलेल्या खासदारांना डावलल्यामुळे शिंदे गटात प्रचंड नाराजी असून, पुढच्या काळात महायुतीत महाभारत होण्याची शक्यता आहे.

शिंदेंचे सहा खासदार निवडणुकीपूर्वीच बाद?
शिवसेनेत फूट पडल्यानंतर १८ पैकी १३ खासदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता. यापैकी रामटेकच्या कृपाल तुमाने यांचे तिकीट आधीच कापण्यात आले होते. गजानन किर्तीकर यांच्या मुलाला ठाकरे गटाने वायव्य मुंबईतून उमेदवारी दिल्याने ते निवडणुकीतून बाहेर पडले होते. भाजपच्या दबावामुळे हेमंत पाटील व भावना गवळी यांची उमेदवारी गेली आहे. नाशिक मतदारसंघासाठी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असून, ही जागा छगन भुजबळ यांच्यासाठी राष्ट्रवादीला दिली जाईल अशी जोरदार चर्चा आहे. तसे झाल्यास हेमंत गोडसे यांचा पत्ता कट होईल. हातकणंगले येथून धैर्यशील माने पुन्हा निवडून येऊ शकणार नाहीत, त्यामुळे उमेदवार बदलावा यासाठी भाजप आग्रही आहे. त्याऐवजी त्यांच्या आई, माजी खासदार निवेदिता माने यांचे नाव पुढे आले आहे.

भावना गवळी बंडखोरी करणार ?
यवतमाळ वाशिम मधून पाच वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या भावना गवळी उमेदवारी नाकारल्याने संतप्त झाल्या असून, त्यांनी बंडाचे संकेत दिले आहेत. आपली उमेदवारी कापली जाण्याची कुणकुण लागल्याने मागच्या काही दिवसांपासून त्या मुंबईत तळ ठोकून बसल्या होत्या. पण त्याचे प्रयत्न यशस्वी झाले नाही. आपल्याऐवजी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याचे वृत्त कळताच त्यांनी आपण माघार घेणार नाही, उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad