दक्षिण-मध्य मुंबईत कोणत्या शिवसेनेचा भगवा फडकणार? - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 March 2024

दक्षिण-मध्य मुंबईत कोणत्या शिवसेनेचा भगवा फडकणार?


मुंबई - दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ (Mumbai south central Lok Sabha constituency) हा गेले कित्तेक दशके शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेमध्ये फूट पडल्यावर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटाकडून दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवार घोषित केले आहेत. यामुळे या बालेकिल्ल्यात नेमका कोणत्या शिवसेनेचा (Shiv Sena-vs-Shiv Sena) भगवा फडकणार हे पाहावं लागणार आहे.

कोणामध्ये लढत ?
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभेचे अणुशक्तीनगर, चेंबूर, धारावी, सायन-कोळीवाडा, वडाळा आणि माहीम असे सहा मतदारसंघ येतात. या लोकसभा मतदारसंघात मिश्र वस्ती असून बहुतांश विधानसभा मतदारसंघांत कष्टकरी, अल्प तसेच अत्यल्प उत्पन्न गटातील लोक राहतात. आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाणारा धारावी झोपडपट्टी याच मतदारसंघात आहे. विविध धर्म, भाषा, अनेक जाती हेच या मतदारसंघाचे वैशिष्ट्य आहे. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामधून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, गिरणी कामगारांचे आक्रमक नेते दत्ता सामंत निवडून आले आहेत. १९८९मध्ये वामनराव महाडिक यांच्या रूपाने हा मतदारसंघ शिवसेनेकडे आला. १९९१ ते २००९ या कालावधीत सलग पाच लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या मोहन रावले यांनी या मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकवला होता. २००९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांनी हा मतदारसंघ काँग्रेसकडे खेचला. त्यानंतर मात्र २०१४ आणि २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांनी पुन्हा हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आणला. शिवसेनेत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट पडले आहेत. त्यानंतर पहिलीच लोकसभा निवडणूक होत आहे. या मतदार संघातून यावेळेस ठाकरे गटाचे अनिल देसाई यांच्या विरोधात शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यात लढत होणार आहे.

कसे आहे समीकरण -
दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात साक्षरतेचे प्रमाण ८१.२ टक्के आहे. २०११च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीच्या मतदारांची संख्या ही जवळपास १ लाख २७ हजार अर्थात ८.६ टक्के आहे. तर, मुस्लिम मतदारांची संख्या २ लाख २९ हजार अर्थात १९.७ टक्के एवढी आहे. याशिवाय बौद्ध समाजाचे ४.५८ टक्के, खिश्चन समाजाचे १.१ टक्के एवढे, तर शिख समाजाचे ०.४७ टक्के एवढे मतदार आहेत. मागच्या लोकसभेला येथे ५५.३ टक्के मतदान झाले होते. या लोकसभा मतदारसंघात अणुशक्ती नगर, चेंबूर, धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा आणि माहीम या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यातील वडाळा आणि शीव कोळीवाडा हे भाजपकडे आहेत. अणुशक्तीनगर राष्ट्रवादीकडे, चेंबूर ठाकरे गटाकडे, धारावी काँग्रेसकडे आणि माहीम शिंदे गटाकडे आहे.

काय आहेत समस्या ?
६० हजार झोपड्यांच्या धारावीचा रखडलेला पुनर्विकास ही या मतदारसंघातील ज्वलंत समस्या आहे. ६०० एकरवरील धारावीच्या पुनर्विकासाचा प्रकल्प आता सुरू होत असून अदानी समूहाने पुनर्विकासाची निविदा जिंकली आहे. तरी लघुउद्योग, असंघिटत, संघटित कामगार आणि विविध जाती-धर्माचे समुदाय अशा सगळ्यांच्या सहमतीने हा प्रकल्प पुढे नेणे हे सर्वांत मोठे आव्हान सरकारसमोर आहे. याशिवाय चेंबूर तसेच दादर-माहीममधील वाहतुकीची समस्या, चाळींचा पुनर्विकास यासारख्या समस्याही आवासून उभ्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad