Lok Sabha Election 2024 - लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 March 2024

Lok Sabha Election 2024 - लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं


मुंबई - देशात 18 व्या लोकसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्व राज्ये व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये १९ एप्रिल ते १ जून दरम्यान सात टप्प्यात मतदान केले जाणार आहे. तर ४ जूनला मतमोजणी होणार आहे. अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली. निवडणूक कार्यक्रमांच्या या घोषणेमुळे देशात आजपासून आदर्श आचार संहिता लागू झाली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने येथील विज्ञान भवनात आज पत्रकार परिषद घेवून 18 व्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि डॉ.सुखबीर सिंह संधू यावेळी उपस्थित होते.

देशभरात ९७ कोटी मतदार या निवडणुकीमध्ये सहभागी होणार आहेत. त्यात ४९.७ पुरुष तर ४७.१ महिला मतदार आहेत. ४८ लाख तृतीयपंथी, ८२ लाख प्रौढ मतदार, १८ ते २१ वयोगटातील २१.५० कोटी, १०० वर्षावरील २ लाख १८ हजार मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणारा आहेत. १ कोटी २८ लाख नवीन मतदारांची यंदा नव्याने नोंदणी करण्यात आली आहे अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली.

निवडणूक प्रक्रिया चांगल्या प्रकारे पार पाडावी म्हणून देशात साडे दहा लाखाहून अधित मतदान केंद्र आहेत. मतदान करण्यासाठी ५५ लाख एव्हीएम मशीन वापरली जाणार आहेत. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी आणि सुरक्षा यासाठी १ कोटी ५ लाख निवडणूक अधिकाऱ्यांसह सुरक्षा रक्षक असणार आहेत. निवडणूकीवर लक्ष ठेवण्यासाठी २१०० निरीक्षक नियुक्त केले जाणार आहेत.

निवडणूक यंत्रणेसमोर ही चार आव्हाने -
आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केल्यास बळाचा प्रयोग(मसल पावर), पैशांचा वापर (मनी पावर), चुकीची माहिती(मिस इन्फॉर्मेशन) आणि माध्यम समन्वय समितीच्या नियमांचे उल्लंघन ही निवडणूक यंत्रणेसमोरील महत्वाची आव्हाण असून यावर मात करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्याचेही राजीव कुमार यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदान -
महाराष्ट्रातील ४८ लोकसभा जागांसाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात राज्यातील एकूण ५ लोकसभा मतदार संघांसाठी निवडणुका पार पडणार आहेत. दुस-या टप्प्यात २६ एप्रिल रोजी राज्यातील ८ मतदार संघांसाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत. ७ मे रोजी तिस-या टप्प्यात राज्यातील एकूण ११ मतदार संघांसाठी, १३ मे रोजी चौथ्या टप्प्यात तर २० मे रोजी राज्यातील उर्वरित १३ मतदार संघांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे -
● 1 कोटी 84 लाख मतदार (वयाची 18 वर्षे पूर्ण झालेले ) देशात प्रथमच मतदाते
● 18 ते 29 वर्ष वयोगटातील 21 कोटी 50 लाख मतदार
● देशात 85 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील 82 लाख मतदार
● 100 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील 2 लाख मतदार
● 85 वर्षावरील व 40 टक्के पेक्षा जास्त दिव्यांगता असणाऱ्या व्यक्तींसाठी देशात प्रथमच घर जावून मतदान
● 12 राज्यात महिला मतदारांचे प्रमाण प्रति 1 हजार पुरुषांच्या तुलनेत 1 हजारापेक्षा जास्त. देशात 1 हजार पुरुषांमागे सरासरी 948 महिला मतदार

महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक मतदान कधी आणि कुठे ? -
● पहिला टप्पा 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
● दुसरा टप्पा 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
● तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
● चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
● पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad