मुंबई - दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई यांना जोडणाऱ्या अटल सेतू (मुंबई ट्रान्स हार्बर) मार्गे बेस्ट उपक्रमाच्या बसगाडीची बेलापूर ते कुलाबा अशी बसवाहतूक १४ मार्चपासून सुरू करण्यात आली आहे. मात्र फक्त १३ दिवसांत म्हणजे २६ मार्चपर्यंत बेस्टला या बससेवेपोटी १ लाख ४ हजार ६१२ रुपयांची कमाई झाली आहे. म्हणजे सरासरी दररोज ७ हजार ४७२ रुपयाचे उत्पन्न मिळाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.अटल सेतू (मुंबई ट्रान्स हार्बर) वरून बेस्टसेवा सुरू झाली आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाला उत्पन्नाचे एक नवीन स्त्रोत निर्माण झाले आहे. या बससेवेला आणखीन चांगला प्रतिसाद लाभला तर बसगाड्यांची संख्या व फेऱ्या वाढविल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेस्टच्या उत्पन्नात भर पडणार आहे.
बेस्ट उपक्रमाने, अटल सेतूवरून १४ मार्चपासून बेस्ट उपक्रमातर्फे प्रवासी बस वाहतूक सुरू केली. मात्र या मार्गावरून ये-जा करण्यासाठी प्रत्येक प्रवाशाला किमान ५० ते २२५ रुपये मोजावे लागत आहेत. बेस्ट उपक्रमातर्फे वर्ल्ड ट्रेड सेंटर, कुलाबा कोकणभवन, सीबीडी बेलापूर दरम्यान ॲपवर आधारित एसी प्रीमियम बस सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळतो आहे.
बेस्ट उपक्रमाकडून दररोज सकाळी सीबीडी बेलापूर येथून वर्ल्ड ट्रेड सेंटर, कुलाबापर्यंत तर संध्याकाळी वर्ल्ड ट्रेड सेंटर येथून सीबीडी बेलापूर अशी दैनंदिन बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना किमान ५० रुपये ते संपूर्ण प्रवासासाठी २२५ रुपये तिकीट दर द्यावे लागत आहेत. या बसगाडीचा प्रवास, वर्ल्ड ट्रेड सेंटर, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केन्द्र (मंत्रालय), डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (जीपीओ), पूर्वमुक्त मार्ग अटल सेतू (उड्डाणपूल) उलवे नोड, किल्ले गावठाण, बामणडोंगरी रेल्वे स्थानक कोकण भवन सीबीडी बेलापूर असा सुरू आहे. तसेच, कोकण भवन सीबीडी बेलापूर येथून सकाळी ७.३० पहिली बस आणि दुसरी बस सकाळी ८ वाजता सुटते. तसेच, वर्ल्ड ट्रेड सेंटर येथून पहिली बस संध्याकाळी ५.३० वाजता आणि दुसरी बस ६ वाजता सुटते. या बसमार्गावरील बसगाड्या सोमवार ते शनिवार धावत असून १४ ते २६ मार्च अशा १३ दिवसात बेस्ट उपक्रमाला १ लाख ४ हजार ६१२ रुपयांची कमाई झाली आहे.
No comments:
Post a Comment