मुंबई - मुंबईत धूलिवंदन हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. हा सण काही अतिउत्साही अल्पवयीन मुलांच्या अंगलट आला आहे. धूलिवंदन साजरा करणारे पाच अल्पवयीन मुले सोमवारी (२५ मार्च) सायंकाळी माहिमजवळील समुद्रात बुडाले. त्यापैकी एका मुलाचा मृत्यू झाला आहे. हर्ष किंजले असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. यश कागडा असे बेपत्ता असलेल्या मुलाचे नाव आहे.
धूलिवंदनाच्या निमित्ताने सोमवारी सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर अनेक ठिकाणी तरुण मुले-मुली ग्रुपने एकत्र येत रंगपंचमी साजरी करताना दिसून आले. या मुलांनी मुंबईतील अनेक चौपाट्यांवर रंगपंचमीच्या निमित्ताने गर्दी केली होती. अशीच कॉलेजमध्ये शिकणारी काही मुले माहीम समुद्रकिनारी फिरायला गेली होती.
माहीम समुद्रकिना-यावर काही मुले फिरण्यासाठी गेली असताना त्यातील पाच जण पाण्यात बुडाले. मुले बुडाल्याची माहिती मिळताच अग्निशमन व जीवन रक्षकांनी त्यांना वाचविण्यासाठी धाव घेतली. पाण्यात बुडाल्यापैकी चार जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी समद्रातून बाहेर काढले. हर्ष किंजले या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तर यश कागडा या मुलाचा अग्निशमन विभागाकडून शोध सुरू आहे. दोन मुलांवर हिंदुजा रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment