सामाजिक न्यायाचे पर्व निर्माण करण्यासाठी हे शासन कटिबद्ध - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 March 2024

सामाजिक न्यायाचे पर्व निर्माण करण्यासाठी हे शासन कटिबद्ध - मुख्यमंत्री


ठाणे - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शक तत्वांवर काम करीत आहेत. संपूर्ण देशात सामाजिक न्याय, सामाजिक समता, समाजाचा सर्वांगीण विकास या दृष्टीने केंद्र आणि राज्य शासन प्रयत्नशील आहे. सामाजिक न्यायाचे पर्व निर्माण होण्यासाठी, त्या दृष्टीने काम करण्यासाठी हे शासन देखील कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कल्याण येथे केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र स्मारक समिती, महाराष्ट्र शासन, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रभाग क्षेत्र कार्यालय (५/ड प्रभाग) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्रांतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र स्मारक समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब रोकडे, उपाध्यक्ष विवेक जगताप, माजी महापौर रमेश जाधव, स्थानिक पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आपल्यावर खूप उपकार आहेत. त्यांच्यासमोर सदैव नतमस्तक राहावे, असे हे व्यक्तिमत्त्व आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात उभे केलेले काम संपूर्ण जगाला मार्गदर्शक ठरले आहे. जगातील सर्वोत्तम संविधान त्यांनी जगाला दिले आहे. कल्याण (पूर्व) येथील निर्माण केलेल्या या स्मारकाच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संपूर्ण जीवनपट विविध प्रकारे उलगडून दाखविला जाणार आहे.

डॉ. बाबासाहेबांच्या शिकवणीनुसार सामाजिक क्रांतीचा वसा घेऊन हे शासन काम करीत आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, शिक्षण, आर्थिक, विचार स्वातंत्र्य ही बाबासाहेबांनी दिलेली शिकवण हाच या सरकारच्या राज्यकारभाराचा पाया आहे. या संविधानामुळेच सर्वसामान्य व्यक्ती खासदार, आमदार, मुख्यमंत्री बनू शकतो. डॉ.बाबासाहेबांचे कर्तृत्व हे अशा स्मारकांमध्ये निश्चितच मावणारे नाही. परंतु त्यांचा जीवनपट अशा स्मारकांमधून लोकांसमोर आणल्यानंतर हे स्मारक सर्वांसाठी ऊर्जा स्रोत ठरणार आहे. सरकारच्या माध्यमातून या स्मारकाच्या पुढील निर्माणासाठी देखील निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही ते शेवटी म्हणाले.

याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक परिवर्तनाचा विचार मांडला. हा विचार घेऊनच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी तसेच महाराष्ट्र सरकार आपले काम करीत आहे. म्हणूनच डॉ.बाबासाहेबांनी दिलेला सर्वधर्मसमभावाचा विचार घेऊन आपला भारत देश सर्वांगीण विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे दिसून येते.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या स्मारकाच्या निर्मितीविषयीचे विचार व्यक्त करताना सांगितले की, हे स्मारक सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचे यश आहे. सर्वांचे आभार व्यक्त करीत ते पुढे म्हणाले की, हे फक्त पुतळ्याचे अनावरण नाही तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र विविध माध्यमातून लोकांसमोर ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. हे स्मारक केवळ इमारत म्हणून नाही तर पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरणारे दिशादर्शक ज्ञान केंद्र असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक बुद्धवंदना करण्यात आली आणि त्यांनतर दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रिमोट ची कळ दाबून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती भव्य पुतळ्याचे अनावरण संपन्न झाले.

या ज्ञान केंद्रांविषयी थोडक्यात...
कल्याण (पूर्व) या परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचे काम प्रगतीपथावर असून त्याचे ८० % काम पूर्ण करण्यात आलेले आहे. या प्रकल्पासाठी सुमारे रु.१६.८५ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.

या ठिकाणी प्रदर्शन हॉल, प्रशासकीय दालन, कन्सेप्ट थीम, होलोग्राफी शो, वाचनालय, उद‌्वाहन, प्रसाधनगृह या सुविधा असून पहिल्या मजल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती पुतळ्यास जिल्हास्तरीय समितीची मान्यता मिळालेली आहे.

या कामासाठी महाराष्ट्र शासनामार्फत "महापालिका क्षेत्रातील मूलभूत सोईसुविधांचा विकास" व "डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना"* तसेच महापालिका निधीतून खर्च करण्यात येत आहे.

या स्मारकाच्या भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ सुमारे १ हजार ३६५ चौ. मी. असून स्मारकाच्या इमारतीचे एकूण क्षेत्रफळ ५४० चौ.मी. आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सुमारे ८ फूट उंचीचा सुशोभित चौथरा बांधून त्यावर १२ फूट उंचीचा ब्राँझ धातूचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. त्याचबरोबर, या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण जीवनावर आधारित विविध घटनांचे प्रोजेक्टरच्या माध्यमातून प्रक्षेपण, थीम व्यवस्था, वाचनालय, होलोग्राफी शो, तैलचित्रे व म्युरल्स इ. सोईसुविधा विविध कक्षात निर्माण करण्यात आलेल्या आहेत. तसेच, वृध्द व अपंग व्यक्तींसाठी उद‌्वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad