मुंबई - केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांना उत्तर मुंबईतून महायुतीतर्फे (Mahayuti) लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजपा विधान परिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या दहिसर (पूर्व) येथील जनसंपर्क कार्यालयात महायुतीचे लोकप्रिय उमेदवार पियुष गोयल यांचे ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी करत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी मागाठाणे विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण उत्तर मुंबईतील समस्या सोडविणार असल्याचे आश्वासन गोयल यांनी उपस्थितांना दिले.
यावेळी मागाठाणे विधानसभा क्षेत्राच्या वतीने आमदार प्रविण दरेकर, खासदार गोपाळ शेट्टी, माजी नगरसेवक प्रकाश दरेकर, आठवले गटाचे रमेश गायकवाड यांनी उमेदवार पियुष गोयल यांचे शाल, श्रीफळ आणि पुष्पहार घालून स्वागत केले. याप्रसंगी मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील पुरुष, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना पियुष गोयल म्हणाले की, मागाठाणे विधानसभेच्या विविध विषयांबाबत आमदार प्रविण दरेकरांशी चर्चा झाली. आम्ही सगळे एकत्र मिळून काम करू. मागाठाणे विधानसभा क्षेत्रात कशा प्रकारच्या सुविधा निर्माण करता येतील, वाहतुकीची समस्या कशी सोडवता येईल, गोरेगाव ते बोरिवली उपनगरीय रेल्वे हार्बर मार्गांवर आणण्याबाबत चर्चा झाली. दिवसरात्र एक करून पूर्ण उत्तर मुंबईतील समस्यांना माझ्या समस्या समजून त्या सोडविण्याचा मी प्रयत्न करेन, असा विश्वासही गोयल यांनी दिला. यावेळी गोयल यांनी 'फिर एक बार, मोदी सरकार ', 'अब की पार ४०० पार' चा नाराही दिला.
No comments:
Post a Comment